SRH vs RR :  सनरायजर्स हैदराबादने राजस्थानवर 36 धावांनी रॉयल विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये धडक मारली आहे. 26 मे 2024 रोजी चेन्नईच्या चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये चषकासाठी भिडत होणार आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानला 139 धावांपर्यंतच रोखलं. हैदराबादच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात राजस्थानचे फलंदाज अडकले. राजस्थानकडून यशस्वी जायस्वाल आणि  ध्रुव जुरेल यांनी एकाकी झुंज दिली. हैदराबादकडून शाहबाद अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी भेदक मारा केला. 


हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेन याच्या अर्धशतकाच्या जोरावर 175 धावांपर्यंत मजल मारली होती. 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही 11 चेंडूत फक्त 10 धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग आज सपशेल अपयशी ठरला. रियान पराग 10 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. 






एका बाजूला विकेट पडत असताना यशस्वी जायस्वाल याची मात्र फटकेबाजी सुरुच होती. यशस्वी जायस्वाल याने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यशस्वी जायस्वाल याने आपल्या वादळी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. कोडमोर 10, संजू सॅमसन 10, रियान पराग 6, आर. अश्विन 0, शिमरोन हेटमायर 4, रोवमन पॉवेल 6 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.


आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने 160 च्या स्ट्राईक रेटने शेवटपर्यंत झुंज दिली. जुरेल याने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षठकार आणि सात चौकार ठोकले. त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळे राजस्थानच पराभव झाला. 


हैदराबादचा फिरकीचा मारा - 


हैदराबादच्या फिरकी गोलंदाजीपुढे राजस्थानचे फलंदाज ढेर झाले. शाहबाज अहमद यानं आपल्या गोलंदाजीचा इम्पॅक्ट पाडला. शाहबाज अहमद याने 4 षटकामध्ये 23 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. अभिषेक शर्मा याने चार षटकात 24 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. टी नटराजन आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.