SRH vs RR Live Score IPL 2024 Qualifier 2: आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यापुढे सनरायजर्स हैदराबादची भक्कम फलंदाजी ढेपाळली. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेटच्या मोबदल्यात 175 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन यानं शानदार अर्धशतक ठोकले, तर राहुल त्रिपाठीने 37 धावांची खेळी केली. राजस्थानकडून आवेश खान आणि बोल्ट यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 176 धावांचे आव्हान मिळालेय. आजच्या सामन्यातील विजेता संघ 26 मे रोजी कोलकात्याविरोधात चेन्नईच्या मैदानावर खेळणार आहे.
हैदराबादची अतिशय खराब सुरुवात -
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. हैदराबादच्या आघाडीच्या फळीला पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडले. अभिषेक शर्मा, एडन मार्करम आणि राहुल त्रिपाठी यांना तंबूत पाठवले. ट्रेंट बोल्ट यानं पहिल्याच षटकात धोकादायक अभिषेक शर्माला बाद केले. बोल्टने हैदराबादच्या पहिल्या तीन फलंदाजांना पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडले. अभिषेक शर्मा 12, एडन मार्करम 1 आणि राहुल त्रिपाठी 37 धावांवर बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना ट्रेविस हेड शांततेत फलंदाजी करत होता.
राहुल त्रिपाठीचं वादळी खेळी -
अभिषेक शर्माने पाच चेंडूत एक चौकार आणि एका षटकारांच्या मदीतने 12 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने छोटी पण आक्रमक खेळी केली. त्रिपाठीने 15 चेंडूमध्ये 246 च्या स्ट्राईक रेटने 37 दावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्रिपाठीने दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. क्वालिफायर सामन्यात संधी मिळालेल्या मार्करमला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मार्करम फक्त एका धावेवर बाद झाला. ट्रेविस हेड याने 28 चेंडूमध्ये संथ 34 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये हेडने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. पॅट कमिन्स 5 आणि जयदेव उनादक 5 धावा केल्या.
हेनरिक क्लासेनची एकाकी झुंज -
ठरावीक अंतराने विकेट पडत असतानाही हेनरिक क्लासेन याने आपलं काम चोख बजावले. क्लासेन याने 34 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. क्लासेन याच्या वादळी खेळीमुळेच हैदराबादचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारु शकला. क्लासेन याने 148 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. क्लासेन याने आपल्या खेळीमध्ये चार षटकार ठोकले. नितीशकुमार रेड्डी याला फक्त पाच धावा करता आल्या. अब्दुल समद याला खातेही उघडता आले नाही. अखेरीस शाहबाद अहमद आणि पॅट कमिन्स यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. शाहबाद अहमद याने 18 चेंडूत एका षटकारासह 18 धावा केल्या.
राजस्थानची गोलंदाजी -
ट्रेंट बोल्ट याने 4 षटकात 5 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. संदीप शर्मा याने 4 षटकात फक्त 25 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. आवेश खान यानेही भेदक मारा केला. त्याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 -
टॉम कोहलर-केडमोर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर : शिमरन हेटमायर
सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 -
ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, जयदेव उनादकट
इम्पॅक्ट प्लेयर : शाहबाज अहमद