SRH vs RR IPL 2024 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा अवघ्या एका धावेनं पराभव केलाय. हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 200 धावांपर्यंत मजल मारु शकला. भुवनेश्वर कुमार यानं भेदक मारा करत राजस्थानचा पराभव केला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी 2 धावांची गरज होती, त्यावेळी भुवनेश्वर कुमारने विकेट घेत हैदराबादला थरारक विजय मिळवून दिला. राजस्थानकडून रियान पराग आणि यशस्वी जायस्वाल यांनी शानदार खेळी केली. पण भुवनेश्वरच्या भेदक माऱ्याच्या जिवावर हैदराबादनं विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारने राजस्थानच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
रियान पराग-यशस्वीची खेळी व्यर्थ -
202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. फॉर्मात असलेला जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांना खातेही उघडता आले नाही. अवघ्या एका धावेवर राजस्थानचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर यशस्वी जायस्वाल आणि रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरला. रियान पराग यानं 40 चेंडूमध्ये 67 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं दोन षटकार आणि सात चौकार ठोकले. तर रियान पराग यानं 49 चेंडूमध्ये 77 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार षटकार आणि आठ चौकाराचा समावेश होता. रियान पराग आणि यशस्वी जायस्वाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची शानदार भागिदारी केली.
राजस्थानने सामना गमावला -
रियान पराग आणि यशस्वी जायस्वाल एकापाठोपाठ एक तंबूत परत्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी हारिकिरी केली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. राजस्थान सामना जिंखणार असे वाटलं होतं. पण पॅट कमिन्स आणि नटराजन यांनी एकापाठोपाठ एक राजस्थानला चार धक्के दिले. नटराजन यानं यशस्वी जायस्वाल आणि शिमरन हेटमायर यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर पॅट कमिन्स यानं ध्रुव जुरेल आणि रियान परागचा पत्ता कट केला. नटराजन आणि कमिन्स यांनी अखेरच्या षटकात भेदक मारा करत सामना फिरवला. हेटमायर 13, पॉवेल 27 धावा काढून बाद झाले. ध्रुव जुरेल याला एकच धाव काढता आली.
भुवनेश्वर कुमार यानं सर्वात भेदक मारा केला. भुवनेश्वर कुमार यानं पहिल्या षटकात दोन विकेट घेतल्या. तर अखेरच्या षटकात मोक्याच्या क्षणी एक विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि नटराजन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.