T20 World Cup 2024 : मागील काही दिवसांपूर्वी विराट कोहली स्ट्राईक रेटमुळे ट्रोल होत होता. आयपीएलमध्ये विराट कोहलीनं 67 चेंडूमध्ये शतक ठोकलं होते, हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संथ शतक ठरलं होतं. विराट कोहलीला संथ फलंदाजीमुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. काही माजी खेळाडूंनीही विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवरुन प्रश्न उपस्थित केला होता. पण बीसीसीनं विराट कोहलीवर विश्वास कामय ठेवत टी 20 विश्वचषकाच्या संघात स्थान दिलं. विराट कोहली सध्या शानदार फॉर्मात आहे. तो सध्या 71 च्या जबरदस्त सरासरीने खेळत असून आतापर्यंत 500 धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीच्या अनुभवाचा टीम इंडियाला फायदा होईल, असं अजित आगरकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. टी 20 विश्वचषकातही विराट कोहलीनं एकापेक्षा एक विक्रम केले आहेत. विराट कोहलीचे टी20 विश्वचषकातील रेकॉर्ड्स पाहून ट्रोलर्सही शांत होतील.
टी20 वर्ल्ड कप आणि कोहली समीकरण
2012 मध्ये विराट कोहली पहिल्यांदाच टी20 विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर त्यानं आतापर्यंत पाच वेळा टी20 विश्वचषकात सहभागी होता. विराट कोहलीनं टी20 विश्वचषकात आतापर्यंत 27 सामने खेळले आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने 25 डावात 82 च्या अविश्वसनीय सरासरीने 1141 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 14 अर्धशतकाचा समावेश आहे. म्हणजेच विश्वचषकात विराट कोहली प्रत्येक दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकतोच. विराट कोहलीच्या शानदार कामगिरीनंतरही त्याला संघाबाहेर ठेवण्याची मागणी काही चाहत्यांनी केली आहे.
वनडे विश्वचषकातही कोहलीची जादू -
आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने 37 डावात 1795 धावा चोपल्या आहेत. सचिन तेंडुलकरनंतर भारताकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने पाच शतके आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याशिवाय चॅम्पियन ट्रॉफीमध्येही विराट कोहलीने खोर्यानं धावा चोपल्या आहेत. पुढील वर्षी चॅम्पियन चषक होणार आहे, त्यामध्ये विराट कोहली आपला करिश्मा दाखवेल. विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 89 च्या सरासरीने 529 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने प्रत्येक आयसीसी स्पर्धेत शानदार कामगिरी करतोच. गेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने केलेली खेळी अविस्मरनीय ठरली. हॅरिस रौफ याला मारलेला षटकार आजही चर्चेत आहे. आयसीसी स्पर्धेत विराट कोहली भारताचा नेहमीच हुकमी एक्का ठरतो, असे असतानाही त्याला संघाबाहेर ठेवण्याची मागणी अनाकलनीय आहे.