Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2024:  दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) खेळाडूंनी अनेक विक्रम मोडीत काढले. या सामन्यात हैदराबादच्या डावात ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) तुफान खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पॉवरप्लेमध्ये हेडने वैयक्तिकरित्या 26 चेंडूत 84 धावा केल्या, पण तरीही तो सुरेश रैनाचा विक्रम मोडू शकला नाही. 


दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने पॉवरप्लेमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. हैदराबादने पहिल्या 6 षटकांत एकही विकेट न गमावता 125 धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम केकेआरच्या नावावर होता. केकेआरने 2017 मध्ये आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमधील षटकांत 105 धावा केल्या होत्या. 






ट्रॅव्हिस हेडची झंझावाती खेळी रैनासमोर अपयशी-


ट्रॅव्हिस हेडची झंझावाती खेळी सुरेश रैनासमोर अपयशी ठरली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने पॉवरप्लेच्या षटकांत 26 चेंडूत 84 धावा केल्या. पण आयपीएल 2014 च्या क्वालिफायर 2 सामन्यात सुरेश रैनाने पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना पॉवरप्लेमध्ये 25 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. हेडने दिल्लीविरुद्धच्या 84 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले. दुसरीकडे, रैनाने 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात 12 चौकार आणि 6 षटकार मारले होते.


निळ्या रंगाच्या जर्सीसमोर ट्रेव्हिस हेडचा बोलबाला-


भारतात झालेला आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 तुम्हाला आठवतंच असेल. ट्रॅव्हिस हेडने वन-डे विश्वचषकांत भारताला आपल्या फलंदाजीतून रडवलं होतं आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला होता.भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्व 2023 च्या अंतिम सामन्यात, ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. विश्वचषकांत इतर संघासमोर हेडला अपयश आले होते. मात्र भारतासमोर त्याने आक्रमक खेळी करत भारताते विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मोडले. 


आयपीएलमध्ये निळ्या जर्सीसमोर काय?


आयपीएलमध्ये देखील निळ्या जर्सी असलेल्या संघासमोर ट्रेव्हिस हेडचा चांगलाच बोलबाला राहिला आहे. मुंबई इंडियन्ससमोर हेडने 24 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. तर काल दिल्लीसमोर 32 चेंडूत 89 धावा केल्या. आरसीबीसमोर हेडने शतक झळकावले होते. आरसीबीच्या नवीन जर्सीच्या रंगामध्ये आता लाल रंगासोबतच निळा रंग देखील आहे. आरसीबीसमोर हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या होत्या. 


संबंधित बातम्या:


आजही विश्वचषकाच्या आठवणीत कोहली; गंभीरला भेटला अन् त्या विकेटबद्दल सर्वच सांगितलं, पाहा Video


विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा


RCB Dinesh Karthik: मी सर्वकाही करण्यास तयार...; दिनेश कार्तिकने आगरकर, द्रविड अन् रोहितच्या कोर्टात टाकला चेंडू, निवड होणार?