रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (RCB Dinesh Karthik) आयपीएलमध्ये सध्या चांगल्या फॉर्मात आहे. आरसीबीची सांघिक कामगिरी चांगली नसली तरी दिनेश कार्तिकची वैयक्तिक कामगिरी आतापर्यंत दमदार राहिलेली आहे. विशेषत: शेवटच्या षटकांत फलंदाजीसाठी येऊन दिनेश कार्तिक स्फोटक फलंदाजी करत आहे. याचपार्श्वभूमीवर आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T-20 World Cup 2024) भारतीय क्रिकेट संघात दिनेश कार्तिकला संधी मिळणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. 


आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या निवडीवरुन दिनेश कार्तिकने स्वत: याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. आयुष्याच्या या वळणावर भारतीय संघात पुनरागमन करणं यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. अजित आगरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्माने माझा विचार केल्यास टी-20 विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी मी 100 टक्के तयार असल्याचे दिनेश कार्तिकने सांगितले. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होण्यासाठी मला जे काही करावे लागेल ते करायला मी तयार असल्याचं सांगत दिनेश कार्तिकने बीसीसीआय, आगरकर, द्रविड, रोहितच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. त्यामुळे आता भारतीय निवड समिती दिनेश कार्तिकचा संघात समावेश करणार की नाही, हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. 


आयपीएल 2024 मधील दिनेश कार्तिकची कामगिरी-


आयपीएल 2024 च्या हंगामात दिनेश कार्तिकने 7 सामन्यात 205.45 च्या स्ट्राईक रेटने 226 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आरसीबीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र दिनेश कार्तिकने 26 चेंडूत 38 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 10 चेंडूत 28 धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 20 धावा केल्या. दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्ध 23 चेंडूत 53 धावा केल्या. दिनेश कार्तिक इथेच थांबला नाही, तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 35 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी केली.


1 जूनपासून रंगणार थरार-


आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा थरार 1 जूनपासून रंगणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. तर दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय संघातील बहुतांश खेळाडू आयपीएल 2024 मध्ये खेळत आहेत. आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.


पात्र ठरलेले 20 संघ...


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 


गटवारी 


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


आजही विश्वचषकाच्या आठवणीत कोहली; गंभीरला भेटला अन् त्या विकेटबद्दल सर्वच सांगितलं, पाहा Video


विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा


ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo