IPL 2022 Playoffs : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे लीग सामने महाराष्ट्रातील चार मैदानात सुरु आहेत. प्लेऑफ आणि फायनलचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथील मैदानावर होणार आहेत. कोलकाता येथील इडन गार्डनवर प्ले ऑफचा पहिला सामना आणि एलिमिनेटरमधील पहिला सामना होणार आहे. कोलकात्यामध्ये होणाऱ्या सामन्याच्या पूर्वतयारीसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार असल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या वृत्तानुसार, गुरुवारी संध्याकाळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान प्लेऑफमधील सामन्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा होणार आहे. सामन्याची तिकिटे, मैदानातील प्रेक्षकांची उपस्थिती, करोनातून सुऱक्षेसाठी काय करावे, यासंदर्भात बैठक होणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याचा परिणाम आयपीएल सामन्यावरही होऊ शकतो.  त्यामुळेच पूर्वतयारीसाठी सौरव गांगुली ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच सामन्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती किती असावी? बीसीसीआयने 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामने खेळवण्याचा विचार केला आहे. त्याबाबतही ममता बॅनर्जी यांचं मत जाणून घेण्याचा सौरव गांगुलीचा विचार असेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्लेऑफ आणि एलिमिनेटर कोलकात्यात खेळवले जातील. तर, दुसरा प्लेऑफचा सामना आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये प्रेक्षकांची पूर्ण उपस्थिती असेल.

आयपीएल 2022 प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
प्ले ऑफचा पहिला सामना 24 मे 2022 कोलकाता (ईडन गार्डन्स)
एलिमिनेटर सामना 26 मे 2022 कोलकाता (ईडन गार्डन्स)
प्लेऑफचा दुसरा सामना 27 मे 2022 अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्डेडियम)
अंतिम सामना 29 मे 2022 अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्डेडियम)

आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होऊन महिन्याचा कालावधी उलटला आहे. आतापर्यंत आयपीएलचा अर्धा हंगाम संपला आहे. लीग सामन्यादरम्यान दिल्लीमधील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे पुढील सामन्याच्या दृष्टीने कोरोना महामारीत सामने करण्यासाठी सुरक्षा हवी आहे. त्यामुळेच सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये भेट होणार असल्याचे समजतेय.