GT Vs SRH: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 40 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GujaratTitans vs SunrisersHyderabad) आमने- सामने आले. या सामन्यात गुजरातच्या संघानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. गुजरातच्या विजयात राशिद खान (Rashid Khan) आणि राहुल तेवतियानं (Rahul Tewatia) महत्वाची भूमिका बजावली. हा सामना हैदराबादच्या दिशेनं झुकत असताना दोघांनी आक्रमक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातच्या विजयासह राशीद खानच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादविरुद्ध अखेरच्या षटकात तीन षटकार मारून त्यानं धोनीच्या (MS Dhoni) विक्रमाशी बरोबरी केली आहे. 


राशिदची नव्या विक्रमाला गवसणी
हैदराबादविरुद्ध सामन्यात राशिद खाननं 20 व्या षटकात तीन षटकार मारले. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना 20 व्या षटकात तीन षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. अक्षर पटेल आणि महेंद्रसिंह धोनीच्या नावावर या विक्रमाची नोंद आहे. अक्षर पटेलनं आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध असा पराक्रम केला होता. तर, त्यापूर्वी एमएस धोनीने 2016 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध तीन षटकार ठोकले होते.


राशिदची तुफानी खेळी
हैदराबाद आणि गुजरात यांच्यात काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला गेलेला सामना रोमहर्षक ठरला. अखेरच्या षटकात गुजरात 22 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर राहुल तेवतियानं एका षटकारासह सात धावा काढल्या. त्यानंतर राशिद खाननं अखेरच्या चार चेंडूत तीन षटकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला. 


गुजरातचा पाच विकेट्सनं विजय
या सामन्यात हैदराबादच्या संघानं गुजरातसमोर 195 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 16 व्या षटकात 140 धावा करत 5 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या राहुल तेवतिया आणि राशिद खाननं विस्फोटक फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-