IPL 2022, RR vs RCB:  अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या जोस बटलरने शतकी खेळी केली. जोस बटलरचे यंदाच्या हंगामातील चौथं शतक होतं.. यासह बटलरने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  


जोस बटलरने यंदाच्या हंगामातील चौथं शतक झळकावलेय. बटलरने 59 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या एकाच हंगामात चार शतकं झळकावण्याचा विक्रमाची बटलरने बरोबरी केली आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये चार शतकं झळकावली होती. या हंगामात विराट कोहलीने तब्बल 973 धावांचा पाऊस पाडला होता. विराट कोहलीने 2016 मध्ये चार शतकांसह सात अर्धशतकं झळकावली होती. बटलरने आज शतक झळकावत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पण एकाच हंगामात सर्वाधिक धावा काढण्याचा विराटचा विक्रम मोडण्याची शक्यता कमीच आहे. कारण जोस बटलरने क्वालिफायर 2 सामन्यानंतर यंदाच्या हंगामात 800 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी बटलरला 170 पेक्षा जास्त धावांचा गरज आहे. फक्त एक सामना उरला आहे.   


सामन्याचा लेखाजोखा - 
जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. 158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी विस्फोटक सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 5 षटकात 61 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वालने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने 21 चेंडूत 23 धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. बटलरने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचवलं.आहे.