Rohit Sharma Future after IPL Auction 2024: सध्या क्रीडा जगतात आयपीएल 2024 (IPL 2024 Auction) ची चर्चा सुरू आहे. अशातच काल (19 डिसेंबर, 2024) आयपीएलच्या (Indian Premier League) आगामी सीझनसाठी मिनी लिलाव पार पडला. दिग्गज खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. आयपीएलच्या (IPL) सर्व संघ मालकांनी खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण, लिलावानंतर ट्रेड विंडो उघडल्यानंतर एक नवी चर्चा कानावर येत आहे. लिलावानंतर, ट्रेड विंडो उघडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघ सोडू शकतो का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याचबाबात सध्या मोठं अपडेट समोर येत आहे.
मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्यानं 'क्रिकबझ' वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत काही अनावश्यक चर्चा सध्या सुरू आहेत. पण महत्त्वाची बातमी म्हणजे, ते कुठेही जात नसून मुंबई इंडियन्स या सर्व खेळाडूंनासोबत ठेवणार आहे. तसेच, पुढे बोलताना या अधिकाऱ्यानं आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीवर वक्तव्य केलं. ते म्हणाले की, आगामी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती. ज्यामध्ये स्वतः रोहित शर्माचाही समावेश होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार आहेत. प्रत्येक खेळाडूनं हा निर्णय मान्य केला आहे.
हार्दिक पांड्याकडे मुंबईची जबाबदारी, पण इकडे माजी कर्णधार रोहितच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित?
मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्स संघाकडून हार्दिक पांड्याला ट्रेड केलं, त्यामुळे आता हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. एवढंच नाहीतर मुंबईत आगमन होताच, त्याच्याकड मुंबईचं कर्णधारपदही देण्यात आलं आहे. हार्दिक पांड्या ट्रेड होताच, तो मुंबईचा कर्णधार होऊ शकतो? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यावर खुद्द मुंबई इंडियन्सनंचं हार्दिक पांड्या कर्णधार झाल्याची घोषणा केली. तसं पाहायला गेलं तर, तशी घोषणा रोहितनं करायला हवी होती. मात्र, मुंबई इंडियन्सनं ती संधी रोहितला दिलीच नाही. यानंतर मात्र मुंबईचे फॅन्स संतापले आणि सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू झाला.
2013 पासून मुंबईचं कर्णधारपद भूषवत रोहितनं मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं. ज्या पद्धतीनं रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेतलं गेलं, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ रोहित शर्माला ट्रेड करू इच्छित असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं. आता मुंबई फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं या सर्व प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. तसेच, रोहित मुंबईकडूनच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भारतीय संघाचा माजी खेळाडू एस. बद्रीनाथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये रोहित चेन्नई सुपर किंग्जचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, असं झालं तर काय होईल? या फोटोवरुनही अनेक चर्चा सुरू होत्या.
आयपीएल ट्रेड विंडोचा नियम काय?
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलं आहे की, बुधवारी (20 डिसेंबर) ट्रेड विंडो उघडल्यानंतर काही खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींमध्ये व्यापार करू शकतात. आयपीएलच्या नियमांनुसार, लीग सुरू होण्याच्या 30 दिवस आधी ट्रेड विंडो उघडी राहील. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रँचायझी आहेत, जे त्यांच्या संघात MI खेळाडूंचा समावेश करण्याचा विचार करत आहेत, रोहितचा देखील त्यात समावेश आहे. मात्र, चेन्नईनं याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं. फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी लिलावाच्या मध्यभागी या वेबसाईटला सांगितलं की, "तत्त्वांनुसार आम्ही खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत व्यापार करण्यासाठी खेळाडूही नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा हेतूही नाही. चेन्नई संघ एमआय खेळाडूंचा व्यापार करू पाहत असल्याच्या मीडियातील चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या.