मुंबई : आयपीएल लिलावात आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. या लिलावात कांगारू खेळाडूंवर बराच पैसा खर्च झाला. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटींना विकत घेतले. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटींमध्ये जोडले. त्याचवेळी गुजरात टायटन्सने स्पेन्सर जॉन्सनसाठी 10 कोटी रुपये खर्च केले. अशा प्रकारे, आयपीएल संघांनी केवळ 3 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 54 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला.
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड...
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडलाही चांगली किंमत मिळाली. ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्स हैदराबादने 6.80 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सने कांगारू वेगवान गोलंदाज जे रिचर्डसनवर ५ कोटी रुपये खर्च केले. लखनौ सुपर जायंट्सने अॅश्टन टर्नरला एक कोटी रुपयांना विकत घेतले.
या आस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली
मिचेल स्टार्क- कोलकाता नाईट रायडर्स (रु. 24.75 कोटी)
पॅट कमिन्स- सनरायझर्स हैदराबाद (२०.५० कोटी)
स्पेन्सर जॉन्सन- गुजरात टायटन्स (10 कोटी)
ट्रॅव्हिस हेड- सनरायझर्स हैदराबाद (6.80 कोटी)
झाय रिचर्डसन- दिल्ली कॅपिटल्स (5 कोटी)
अॅश्टन टर्नर- लखनौ सुपर जायंट्स (रु. 1 कोटी)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये उत्कटता
आयपीएल संघांमध्ये लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कमालीची क्रेझ होती. कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स सारख्या संघांमध्ये मिचेल स्टार्कसाठी बोलीचे युद्ध होते. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादने मोठा खर्च करून पॅट कमिन्सला आपल्या संघाचा भाग बनवले. मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मिशेल स्टार्क आयपीएल 2015 च्या सीझनमध्ये शेवटचा खेळला होता. त्यावेळी मिचेल स्टार्क रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता.
मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली
मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली. मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले.
यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी
यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.