मुंबई : अखेर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या हंगामातील प्रवास संपला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ अखेरच्या सामन्यात देखील विजय मिळवू शकला नाही. होम ग्राऊंडवरच मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध पराभवाचं तोंड पाहावं लागलं. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 214 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ 6 विकेटवर 196 धावा करु शकला. लखनौनं मुंबईवर 18  धावांनी विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर मुंबईचे कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील संभाषण समोर आलं आहे. जॉन्स या क्रिकेटविषयक माहिती देणाऱ्या एक्स प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.


नेमकं काय संभाषण?


मुंबईचे कोच मार्क बाऊचर यांनी म्हटल की, "मी रोहित शर्मासोबत काल रात्री चर्चा केली.आम्ही यंदाच्या हंगामाचा आढावा घेतला. यानंतर त्याला विचारलं की पुढं काय?" यावर रोहित शर्मानं त्यांना 'द वर्ल्ड कप' असं उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.  




मुंबईचा दहावा पराभव


मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचा 17 वा हंगाम निराशाजनक ठरला आहे. मुंबईनं 14 मॅचपैकी केवळ 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर त्यांना दहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दहा पराभवांमुळं मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. 


रोहितची अखेरच्या मॅचमध्ये फटकेबाजी


लखनौनं मुंबईपुढं विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि डेवॉल्ड ब्रेविस यांनी केली होती. रोहित शर्मा आणि ब्रेविस यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करुन देत 88 धावांची भागिदारी केली. मात्र, नवीन उल हकनं ब्रेविसला बाद केल्यानंतर लखनौनं पुन्हा एकदा मॅचवर वर्चस्व मिळवलं. रोहित शर्मानं  38 बॉलमध्ये 68 धावा केल्या. 


नमन धीरनं 28 बॉलमध्ये 62 धावा करुन मुंबईला विजयाच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. 


मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम


मुंबई इंडियन्सनं अखेरचं विजेतेपद 2020 च्या आयपीएलमध्ये मिळवलं होतं. 2022 च्या आयपीएलमध्ये देखील मुंबई इंडियन्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिली होती. 2024 चं आयपीएल देखील मुंबईसाठी तसंच ठरलं आहे. विजेतेपदासाठी कॅप्टन बदलणाऱ्या मुंबईच्या हाती यश आलं नाही. 


संबंधित बातम्या :



मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?