Team India Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाला शिकवणी देण्यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागितले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज स्टिफन प्लेमिंग आणि रिकी पाँटिंग यांना दावेदार मानले जात आहे. पण आता या स्पर्धेत गौतम गंभीर असल्याचेही समोर आले आहे. ESPN क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयकडून गौतम गंभीर याला टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी ऑफर देण्यात आली आहे. पण गौतम गंभीर ही ऑफर स्वीकारणार का? हे पाहावं लागेल. राहुल द्रविड याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. राहुल द्रविड यानं थांबायचं ठरवले आहे, व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही अर्ज करण्यास नकार दिलाय. त्यामुळे टीम इंडियाचा नवा कोच कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 1 जुलैपासून टीम इंडियाला नवा कोच मिळणार आहे. बीसीसीआयची मागणी गौतम गंभीर मान्य करणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. 


टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकने गौतम गंभीर याच्यासोबत संपर्क साधला आहे, असा दावा ESPN क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्समध्ये  करण्यात आला आहे. गौतम गंभीर सध्या आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहेत. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये स्पष्ट चर्चा होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. तर टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 27 मे आहे.  


गौतम गंभीरकडे कोचिंगचा अनुभव नाही - 


गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. 2022-2023 आयपीएल हंगामात गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर होता. लखनौची कामगिरी शानदार झाली होती. यंदाच्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफात्यात आहे. गौतम गंभीर मेंटॉर असताना लखनौ संघ दोन वर्षे प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. यंदा कोलकाताने प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. गुणतालिकेत कोलकाता संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे.


राहुल द्रविडकडून नकार - 


2023 वनडे विश्वचषकानंतर बीसीसीआयच्या विनंतीनंतर राहुल द्रविड यानं कार्यकाळ वाढवण्यास हमी दिली होती. 30 जूनपर्यंत राहुल द्रविड याचा कार्यकाळ आहे. पण आता राहुल द्रविड यानं कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. घरगुती कारण देत राहुल द्रविड याने कोचिंगपासून काढता पाय घेतला आहे. संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना कायम राहण्याची विनंती केली होती. पण राहुल द्रविड याने आधीच निर्णय घेतला होता. लक्ष्मण यानेही नकार दिलाय. त्यामुळे आता बीसीसीआयकडू गौतम गंभीर याच्याकडे विनंती केली आहे.