Ponting Responsible for DC's Losses Says Sehwag : आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघानं अद्याप खातंही उघडलेलं नाही. यंदाच्या हंगामाची सुरुवात दिल्लीसाठी फारच निराशाजनक झाली. त्यानंतर आतापर्यंत दिल्ली संघांने आतापर्यंतचे सलग पाच सामने गमावले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलग पाच सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर आता संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांवरही टिका केली जात आहे. आयपीएलमध्ये 2023 दिल्लीच्या खराब कामगिरीची जबाबदारी प्रशिक्षक रिकी पाँटींगने घ्यावी, असं मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं आहे.


दिल्लीच्या पराभवाची जबाबदार प्रशिक्षक पाँटींगची : सेहवाग


माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे की, या वर्षीच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा खराब कामगिरीसाठी कुणाला दोष द्यायचा असेल तर तो प्रशिक्षक रिकी पाँटिंगला द्यावा. आयपीएल 2023 मध्ये दिल्लीच्या सलग पाचव्या पराभवानंतर सेहवागने प्रशिक्षक पाँटींगवर निशाणा साधला आहे. सेहवाग म्हणाला, "मला वाटतं, जेव्हा एखादा संघ हरतो तेव्हा संघाच्या प्रशिक्षकांना श्रेय दिलं जातं, त्यामुळे जेव्हा संघ हरतो तेव्हाही प्रशिक्षकांना जबाबदार धरलं पाहिजे." 


वीरेंद्र सेहवागचा रिकी पाँटींगवर निशाणा


सेहवाग पुढे म्हणाला की, 'संघाचा कोच रिकी पाँटींगने याआधीच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. आम्ही हे अनेकदा सांगितलंय की पाँटिंगने चमकदार कामगिरी करत दिल्ली संघाला अंतिम फेरीत नेलं आहे. संघ दरवर्षी प्लेऑफमध्ये पोहोचताना पाहायला मिळालं तेव्हा पाँटीगने सर्व श्रेय घेतलं. आता संघाच्या खराब कामगिरीचा जबाबदारी देखील त्याचा घ्यावी लागेल.' क्रिकबझच्या एका कार्यक्रमात सेहवागने हे वक्तव्य केलं आहे.


दिल्ली गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर


दिल्ली कॅपिटल्स संघ शून्य गुणांसह अजूनही गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर स्थिर आहे. दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2023 मधील पाचव्या सामन्यात शनिवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्श बंगळुरु संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली बंगळुरु विरोधात उतरला पण संघाचे फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. त्यांनी पॉवरप्ले दरम्यान 4 झटपट विकेट गमावल्या.


रवी शास्त्रींची सौरव गांगुलीवर टीका


भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाचे मेंटर सौरव गांगुलीवर निशाणा साधला आहे. रवी शास्त्री म्हणाले की, 'सौरव गांगुली यांना वाटलं असेल ही गोष्ट फार सोपी आहे. पण, असं नाही. या स्पर्धेसाठी तुम्हाला योग्य रणनीती आखावीच लागते.' सौरव गांगुली यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटर आणि ऑपरेशन हेड आहेत.