बंगळुरु : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले आहेत. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 29 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेल्या मॅचमध्ये आरसीबीनं दमदार कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्जला ( Chennai Super Kings) पराभूत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास चेन्नईवर 18 धावांपेक्षा अधिक धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. आरसीबीनं अखेरच्या ओव्हरपर्यंत संघर्ष करत चेन्नईला 27 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये एंट्री मिळवली. आयपीएलच्या 17 व्या पर्वापर्यंत तब्बल 9 वेळा आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आरसीबीच्या या विजयाचं जसं खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं तसंच बंगळुरुच्या चाहत्यांनी मैदानाबाहेर देखील जल्लोष साजरा केला.
आरसीबीचा विजयी षटकार अन् प्लेऑफमध्ये एंट्री
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेटवर 218 धावा केल्या होत्या. यामध्ये फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. विशेषत: प्लेऑफच्या एंट्रीसाठी आवश्यक असणारी 201 धावसंख्या देखील ते गाठू शकले नाहीत. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहाणे देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. चेन्नईसाठी अर्धशतकी खेळी करणारा रचिन रवींद्र धावबाद होणं हा मोठा धक्का होता.
शिवम दुबे, डॅरिल मिशेल, सँटनर हे देखील मोठी खेळी करु शकले नाहीत. अखेर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांनी चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले. चेन्नईचा संघ 20 ओव्हरमध्ये 7 बाद 191 धावा करु शकला आणि आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट निश्चित झालं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची आयपीएलची सुरुवात पराभवानं झाली होती. चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच मॅचमध्ये बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर बंगळुरुनं एका मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांचा पुढे सलग पाच मॅचमध्ये पराभव झाला.
आरसीबीच्या चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन
आरसीबीनं अविश्वसनीय कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर बंगळुरुमध्ये त्यांच्या चाहत्यांनी जंगी सेलिब्रेशन केलं. बंगळुरुच्या रस्त्यावर चाहते मोठ्या संख्येनं जमले होते. काही ठिकाणी फटाके वाजवण्यात आले. तर, बंगळुरुची टीम मैदानातून हॉटेलवर जाईपर्यंत चाहते मैदानाबाहेर जमले होते. आरसीबीकडून याचा व्हिडीओ देखील ट्वीट करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला