IPL 2024 CSK vs RCB Marathi News: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामन्यात बंगळुरुने 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बंगळुरुने प्ले ऑफच्या फेरीत स्थान मिळवलं. चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होचा. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने 218 धावा केल्या होत्या.
219 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्या चेंडूवर मोठा धक्का बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्य धावावर बाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यश दयालच्या गोलंदाजीवर मिचेल 4 धावांवर असताना झेलबाद झाला. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 61 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 33 धावा, शिवम दुबेने 7, रविंद्र जडेजाने नाबाद 42 धावा केल्या आणि एमएस धोनीने 25 धावा केल्या. चेन्नईला 20 षटकांत केवळ 191 धावा केल्या.
4 संघ प्ले ऑफसाठी पात्र-
कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे चार संघ प्ले ऑफच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
फाफ ड्यू प्लेसीसच्या आरसीबीकडून सर्वाधिक धावा-
आरसीबीकडून विराट कोहलीने 47 धावांची खेळी केली. तर कर्णधार फाफ ड्यू प्लेसीसने 54 धावा केल्या. यानंतर रजत पाटीदारने आक्रमक फलंदाजी करत 23 चेंडूत 41 धावा केल्या. तर कॅमरॉन ग्रीनने 38, दिनेश कार्तिक 14 आणि ग्लेन मॅक्सवेलने 16 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीचा भीमपराक्रम-
विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आहे. एबी डिव्हिलियर्सने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 1960 धावा केल्या आहेत.