RCB Virat Kohli on IPL Impact Player Rule: इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2023 एक नियम जोडला गेला, ज्याला 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम (Impact Player Rule) असे नाव देण्यात आले. मात्र या नियमावरुन विविध खेळाडूंनी नाराजी व्यक्ती केली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील या नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नसल्याचं म्हटलं. याचदरम्यान आता विराट कोहलीने (Virat Kohli) देखील इम्पॅक्ट प्लेयर नियमावर प्रतिक्रिया दिली आहे.
इम्पॅक्ट प्लेयर नियमावरुन रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. मनोरंजन हा खेळाचा एक पैलू आहे पण त्यात समतोल असायला हवा. यामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे आणि मलाच नव्हे तर अनेकांना असे वाटते. क्रिकेट हा 12 नव्हे तर 11 खेळाडूंचा खेळ आहे. सर्वचं संघाकडे बुमराह आणि राशिद खानसारखे गोलंदाज नाहीय, असं विराट कोहलीने सांगितले.
रोहित शर्मा काय म्हणाला होता?
याबाबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नाही, कारण त्यांना कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मात्र, या नियमामुळे दोन भारतीय खेळाडूंना अतिरिक्त खेळण्याची संधी मिळते, ही सकारात्मक बाब आहे."
'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाची चर्चा का?
'टेस्ट केस' म्हणून आणलेल्या 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाचा सध्याच्या आयपीएलवर खूप परिणाम झाला आहे. या मोसमात आतापर्यंत संघांनी 8 वेळा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की हा नियम गोलंदाजांसाठी हानिकारक आहे, कारण यामुळे संघांना लांब फलंदाजी करण्याची संधी मिळते.
काय म्हणाले जय शहा?
जय शाह म्हणाले की, यावर अंतिम निर्णय सर्व संबंधित पक्षांसोबत बैठकीनंतर घेतला जाईल, जो कदाचित टी-20 विश्वचषकानंतर होईल. "खेळाडूंना वाटत असेल की हा नियम योग्य नाही, तर आम्ही त्याबद्दल बोलू. आतापर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही. आयपीएल आणि वर्ल्ड कपनंतर आम्ही भेटून निर्णय घेऊ. कायमस्वरूपी नाही, असा कोणताही नियम नाही, किंवा आम्ही ते रद्द करू असे मी म्हणत नाही."
'इम्पॅक्ट प्लेयर' नियम काय आहे?
इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमानुसार, नाणेफेकीनंतर, प्रत्येक संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी, त्यापैकी एक – ज्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणतात – प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही सदस्याची जागा घेऊ शकतो.