RCB, IPL 2022 Marathi News : वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीचा संघ हिरवी जर्सी घालून मैदानात उतरला होता. 2011 पासून आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करतो. हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीचा विक्रम खराब आहे... आतापर्यंत त्यांना फक्त तीन सामनेच जिंकता आले आहेत. हाच नेमका योगायोग आहे.. हिरव्या रंगाच्या जर्सीत आरसीबीने जेव्हा जेव्हा सामना जिंकला.. तेव्हा तेव्हा फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे यंदाही आरसीबी आयपीएलचा अंतिम सामना खेळणार का? याचा कयास लावला जात आहे....
2011 मध्ये आरसीबी पहिल्यांदा हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. आरसीबीने हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये गुजरातचा पराभव केला होता. या हंगामात आरसीबीने थेट फायनलला धडक मारली होती. पण अंतिम सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता... त्यानंतर आरसीबीचा संघ 2016 मध्ये हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये जिंकला होता. आरसीबीने गुजरात लॉयन्सचा पराभव केला होता. पण दुर्देवीपणे पुन्हा फायनलमध्ये आरसीबीला पराभवाचा धक्का बसला होता. 2016 मध्ये हैदराबाद संघाने आरसीबीचा पराभव करत चषकावर नाव कोरले होते.
आता आरसीबीने तब्बल सहा वर्षानंतर हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये सामना जिंकला आहे. त्यामुळे आरसीबीचा संघ यंदा आयपीएलची फायनल खेळणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. यंदाच्या हंगामात आरसीबीने 12 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. आरसीबीचा संघ सध्या 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला पुढील प्रत्येक सामन्यात विजय महत्वाचा आहे. आरसीबीचा पुढील सामना पंजाब किंग्ससोबत 13 मे रोजी होणार आहे. तर यंदाच्या हंगामातील आरसीबीचा अखेरचा सामना गुजरातविरोधात 19 मे रोजी होणार आहे.
हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -
आयपीएल 2011- विजय
आयपीएल 2012- पराभव
आयपीएल 2013- पराभव
आयपीएल 2014- पराभव
आयपीएल 2015 -निकाल नाही
आयपीएल 2016- विजय
आयपीएल 2017- पराभव
आयपीएल 2018- पराभव
आयपीएल 2019- पराभव
आयपीएल 2020- पराभव
आयपीएल 2021- निळ्या रंगाची जर्सी (पराभव)
आयपीएल 2022 - विजय
हिरव्या रंगाच्या जर्सी परिधान करण्यामागे काय आहे कारण?
आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात हिरवी जर्सी परिधान करतात. 2011 पासून आरसीबीचा संघ हंगामातील एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालतो. आरसीबीचे मालक सिद्धार्थ मल्ल्या यांच्या कल्पनेतून गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती. प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता. आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.