KKR vs PBKS : कोलकात्याविरोधात पंजाबनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पंजाबनं 262 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. कोलकात्यानं दिलेले 262 धावांचे आव्हान पंजाबने 8 चेंडू आणि 8 विकेट राखून सहज पार केले. पंजाबकडून जॉनी बेयरस्टोनं वादळी शतक ठोकलं. तर शशांक सिंह आणि प्रभसिमरन यांनी विस्फोटक अर्धशतकं ठोकली. कोलकात्याची गोलंदाजी आज सपशेल फेल ठरली. एकाही गोलंदाजाला पंजाबच्या फलंदाजाला रोखता आलं नाही. 


कोलकात्यानं दिलेल्या 262 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन आणि जॉनी बेयरस्टो यांनी वादळी सुरुवात केली. प्रभसिमरन यानं अवघ्या 20 चेंडूमध्ये 54 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर जॉनी बेयरस्टो यानं 48 चेंडूमध्ये नाबाद 108 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत जॉनीने नऊ षटकार आणि आठ चौकार लगावले.  पंजाबने पहिल्या विकेटसाठी 6 षटकांमध्ये 93 धावांचा पाऊस पाडला. 


रायली रुसो यांनी 16 चेंडूत 26 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर शशांक सिंह यानं पुन्हा एकदा जलवा दाखवला. शशांक सिंह यानं अवघ्या 28 चेंडूमध्ये 68 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. कोलकात्याकडून आठ गोलंदाजांचा वापर करण्यात आला, पण एकालाही यश आले नाही. सुनिल नारायण याला एक विकेट मिळाली, तर एक फलंदाज धावबाद झाला.


आजच्या सामन्यातील ठळक बाबी - 


टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेस आज पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात 523 धावांचा पाऊस पडला. 45 चेंडूमध्ये शतक पाहायला मिळाले, त्याशिवाय चार अर्धशतकेही वेगवान झाली. 18, 23,23 आणि 25 चेंडूमध्ये चार अर्धशतकं झाली. 42 षटकार आणि 37 चौकार आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. 



42 षटकार अन् 37 चौकार - 


कोलकाता आणि पंजाब सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाऊस पडला आहे. 20 षटकांमध्ये 523 धावांचा पाऊस पडलाय. आजच्या सामन्यात तब्बल 42 षटकार पाहायला मिळाले. तर 37 चौकार आजच्या सामन्यात लगावले गेलेत. आयपीएलच्या इतिहासतील एखाद्या सामन्यातील हे सर्वाधिक षटकार आहेत.


टी 20 क्रिकेटमधील सर्वात य़शस्वी पाठलाग


आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकानं वेस्ट इंडिजविरोधात 259 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. हा विक्रम आज मोडीत निघाला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात धावांचा पाठलाग ठरलाय. पंजाबनं 262 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर मिडिलेक्स संघाचा क्रमांक लागतो. त्यांनी सरे संघाविरोधात 253 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरोधात 244 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. 


कोलकात्याचा 261 धावांचा डोंगर - 


कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 261 धावाचा डोंगर उभारला. कोलकात्याकडून फिलिप सॉल्ट यानं 37 चेंडूमध्ये 75 धावांची खेळी केली. सुनिल नारायण यानं 32 चेंडूमध्ये 71 धावांचा पाऊस पाडला. वेंकटेश अय्यरनं 39, अय्यरने 28 तर रसेलने 24 धावा केल्या.