MI vs RR, IPL 2024 : वानखेडेवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहा विकेटने दारुण पराभव केला. मुंबईने दिलेले 126 धावांचे आव्हान राजस्थानने सहा विकेट आणि 27 चेंडू राखून सहज पार केले. राजस्थानकडून रियान पराग यानं नाबाद अर्धशतकी खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल यानं तीन जणांना तंबूत पाठवलं.  यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव झाला आहे. त्याशिवाय घरच्या मैदानावर सामना गमावणारा मुंबई दुसरा संघ ठरला आहे. याआधी आरसीबीचा घरच्या मैदानावर पराभव झाला होता. 


मुंबईने दिलेल्या 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. यशस्वी जायस्वाल फक्त 10 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वालने सहा चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने 10 धावा काढल्या.यशस्वी तंबूत परतल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण आकाश मधवाल यानं एकापाठोपाठ एक दोन धक्के देत सामना रोमांचक केला. जोस बटलर याने 16 चेंडूमध्ये दोन चौकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. तर कर्णधार संजू सॅमसन यानं 10 चेंडूमध्ये तीन चौकाराच्या मदतीने 12 धावांचे योगदान दिले. 






आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर रियान पराग यानं सुत्रे हातात घेत राजस्थानला विजय मिळवून दिला. रियान पराग याला अनुभवी अश्विन यानं चांगली साथ दिली. आर अश्विन यानं 16 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. अश्विन बाद झाल्यानंतर शुभमन दुबे आणि पराग यांनी राजस्थानला विजय मिळवून दिला. शुभम दुबे याने 6 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने नाबाद 8 धावांची खेळी केली. 


रियान पराग यानं आज पुन्हा एकदा मैदान मारले. रियान पराग यानं संयमी फलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. रियान पराग यानं 39 चेंडूमध्ये नाबाद 54 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि पाच चौकाराचा समावेश होता. ट्रेंट बोल्ट याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बोल्टने मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. बोल्ट यानं मुंबईला सुरुवातीलाच तीन धक्के देत सामना राजस्थानच्या बाजूने वळवला.


मुंबईची गोलंदाजी कशी राहिली ?


आकाश मधवाल याचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. आकाश मधवाल यानं 4 षटकांत 20 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. माफाका याला एक विकेट मिळाली, पण त्यानं दोन षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या. जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जे आणि पियूष चावला यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. कोइत्जे याने जवळपास प्रतिषटक 15 धावा खर्च केल्या.