MI vs RR, IPL 2024 : घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईची अवस्था अतिशय खराब झाली आहे.  राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्टने मुंबईला सुरुवातीलाच धक्क्यावर धक्के दिले.  ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे रोहित शर्माही स्थिरावला नाही. बोल्टने पहिल्या चेंडूपासून अचूक टप्प्यावर मारा केला. प्रथण फलंदाजी करणाऱ्या मुंबईची अवस्था अतिशय बिकट आहे. बोल्टने मुंबईच्या तीन फलंदाजांना खातेही उघडू दिले नाही. 


ट्रेंट बोल्ट याआधी मुंबईच्या संघाचा सदस्य राहिला आहे. त्यामुळे मुंबई आणि वानखेडे संघाबाबत ट्रेंट बोल्टला सखोल माहिती असेलच. त्याचाच फायदा बोल्टने घेतला. ट्रेंट बोल्टने रोहित शर्मासह मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजी उद्धवस्थ केली. रोहित शर्मा याला बोल्टचा पहिला चेंडू समजलाच नाही.. चेंडू बॅटची कड घेऊन संजू सॅमसनकडे विसावला. संजू सॅमसनने विकेटच्या मागे शानदार झेल घेतला. रोहित तंबूत परतल्यानंतर युवा नमन धीर मैदानावर आला. पण त्याला बोल्टने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. त्यानंतर पुढच्या षटकांमध्ये डेवाल्ड ब्रेविस यालाही बोल्टने तंबूत धाडले.  ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली. 






मुंबईची फलंदाजी ढेपाळली असताना दुसऱ्या बाजूला ईशान किशन शानदार फलंदाजी करत होता. इशान किशन यानं नांद्रे बर्गर याला षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. पण पुढच्याच षटकात नांद्रे बर्गर यानं ईशान किशन याला तंबूचा रस्ता दाखवला. बर्गरच्या चेंडूवर ईशान किशन यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने बॅटची कड घेतली. ईशान किशन याची खेळी 16 धावांवर संपुष्टात आली. 







ट्रेंट बोल्ट आणि नांद्रे बर्गर यांच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईची आघाडीची फळी ढेपाळली. एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. बोल्टने दोन षटकांमध्ये फक्त चार धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. यामध्ये रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेबिस याचा समावेश आहे. नांद्रे बर्गर यानं 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च करत ईशान किशन याला तंबूत धाडलं. चार षटकांचा खेळ झाला तेव्हा मुंबई इंडियन्स चार बाद 20 आशा दैयनीय अवस्था झाली. तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर आहेत. 



मुंबई इंडियन्स प्लेईंग 11 - 


रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, गेराल्ड कोइत्जे, पियुष चावला, आकाश मढवाल, जसप्रीत बुमराह, केव्ना माफाका



राजस्थानची प्लेईंग 11 - 


यशस्वी जायस्वाल, जोश बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरोन हिटमायर, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल