Mumbai Indians Hardik Pandya: आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आता सूर गवसल्याचं चित्र आहे. मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर सलग दुसरा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबईनं आरसीबीवर 7 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. मुंबईनं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या वादळी खेळीच्या जोरावर विजयावर नाव कोरलं. मात्र हार्दिक पांड्याला अजूनही चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. 


आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात येताच मुंबईच्या प्रेक्षकांनी रोहित रोहित अशा घोषणा दिल्या. वानखेडेमध्ये उपस्थित असणारे प्रेक्षक हार्दिक पांड्याला डिवचू लागले होते.  विराट कोहलीच्या हे लक्षात येताच त्याने अशी कृती न करण्याचं आवाहन केलं. याआधीच्या सामन्यात देखील हार्दिकला हूटिंगचा सामना करावा लागला होता. यावर आता मुंबईचा फलंदाज इशान किशन याने भाष्य केलं आहे. 


मैदानावर आणि मैदानाबाहेर केलेल्या मेहनतीबद्दल हार्दिकला एक दिवस चाहत्यांकडून दाद मिळेल, असं इशान किशन म्हणाला. तसेच हार्दिक पांड्याला आव्हाने आवडतात. याआधीही अशीच परिस्थिती होती आणि आताही तीच परिस्थिती आहे. मला माहित आहे की तो एक असा खेळाडू आहे जो मैदानाबाहेर खूप मेहनत करतो, असं इशान किशनने सांगितले. सामना संपल्यानंतर इशान किशनने पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.


हार्दिक तक्रार करणार नाही-


मला माहित आहे की, हार्दिक याचा आनंद घेत असेल. मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. तो आव्हानांसाठी तयार आहे कारण तुम्ही चाहत्यांची तक्रार करू शकत नाही. ते त्यांच्या अपेक्षा घेऊन येतील, त्यांची मते मांडतील. पण त्याचवेळी हार्दिक पांड्या कसा विचार करतो हे मला माहीत आहे. त्याला आव्हाने आवडतात. हार्दिक हा अशा प्रकारचा माणूस नाही जो बाहेर येईल आणि चाहत्यांना बडबड थांबवण्यास सांगेल, कारण त्याच्या स्वतःच्या अपेक्षा आणि मानसिकता आहे. मात्र, चाहत्यांना लवकरच नव्या कर्णधारावर प्रेम वाटू लागेल, असं इशान किशनने सांगितले. 


ड्रेसिंग रुममध्ये हार्दिकच्या हूटिंगबाबत...


येत्या सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करेल आणि लोक त्याला पुन्हा पसंत करू लागतील. कारण तुम्ही चांगले काम करत असाल तर लोक तुमची मेहनत ओळखतील. आमचे चाहते असे आहेत. ड्रेसिंग रुममध्ये हार्दिकच्या हूटिंगबाबत कोणतीही चर्चा होत नाही. कारण ड्रेसिंग रुममधील प्रत्येकजण कर्णधाराला पूर्ण पाठिंबा देत आहे. मी त्याच्यासाठी आनंदी आहे की हार्दिक या परिस्थितीतही कामगिरी करण्यास उत्सुक आहे. तो मैदानात उतरत आहे आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो आहे, असं कौतुकही इशान किशनने यावेळी केलं.


संबंधित बातम्या:


MI vs RCB: पहिल्या 6 सामन्यानंतरच मानली हार...फाफ डू प्लेसिस संतापला, आरसीबीचा कर्णधार काय बोलून गेला?


आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table


रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video