SRH vs MI: हार्दिक पांड्याचा भेदक मारा आणि सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने हैदराबादचा 7 विकेटनं पराभव केला आहे. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूमध्ये वादळी शतक ठोकलं. हैदराबादने दिलेले 174 धावांचे आव्हान मुंबईने 7 विकेट आणि 16 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव यानं षटकार ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईविरोधातील पराभवानंतर हैदराबादचं प्लेऑफचं गणित कठीण झालेय. आता हैदराबादला पुढील प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य झाला आहे.
पराभवाचा वचपा काढलाच -
मुंबईने हैदराबादवर सात विकेटनं विजय मिळवत पराभवाचा वचपा काढलाय. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा दारुण पराभव केला होता. हैदराबादनं मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत 277 धावांचा पाऊस पाडला होता. याच पराभवाचा वचपा आज मुंबईने काढला. 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने तीन विकेट गमावत 17.2 षटकात पार केले.
सूर्याचं वादळी शतक -
सूर्यकुमार यादव यानं वादळी शतक ठोकत मुंबईला एकतर्फी विजय मिळवला. खराब सुरुवातीनंतर सूर्याच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबईला सहज विजय मिळाला. सूर्यकुमार यादव यानं 21 चेंडूमध्ये 102 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये सूर्याने 12 चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला. सूर्यानं आयपीएलमधील दुसरं शतक झळकावलं.
तिलकची शानदार साथ -
आघाडीच्या विकेट गेल्यानंतर तिलक वर्माने सूर्याला चांगली साथ दिली. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिलक वर्माने 32 चेंडूमध्ये नाबाद 37 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये तिलकने सहा चौकार ठोकले. तिलकने सूर्यकुमार यादव याच्यासोबत शतकी भागिदारी केली.
आघाडीचे फलंदाज फ्लॉप -
174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 31 धावांमध्ये मुंबईने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. इशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मात्र सूर्याचा शो सुरु झाला. सूर्यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.
सूर्यकुमार यादवपुढे हैदराबादची गोलंदाजी फ्लॉप ठरली. भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. नटराजन, रेड्डी आणि शाहबाज अहमद यांच्या विकेटची पारी कोरीच राहिली.