IPL 2024 : खेळाडू शानदार खेळल्यानंतर संघाची कामगिरीही जबरदस्त होते, असेच असायला हवं. पण आयपीएल 2024 चा हिशोबच वेगळा आहे. इथं जे खेळाडू हिट ठरलेत, त्यांचे संघ मात्र फ्लॉप ठरले आहेत. खेळाडू शानदार खेळले पण काही संघाची कामगिरी मात्र सर्वसामान्य राहिली आहे. होय... ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे. नसेल तर फक्त एकच करा.. गुणतालिका आणि ऑरेंज-पर्पल कॅप स्पर्धेतील खेळाडूंची यादी पाहा... तुम्हाला उत्तर लगेच मिळेल.
रविवारी आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कोलकाता संघाने अव्वल स्थानावर झेप घेतली. त्याशिवाय राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि हैदराबाद संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यासारखे संघ गुणतालिकेत तळाला आहेत. आरसीबी सध्या सातव्या क्रमांकावर विराजमान आहे, तर मुंबई इंडियन्स दहाव्या स्थानावर आहे.
ऑरेंज कॅप विराटकडे तर पर्पल कॅप बुमराहच्या डोक्यावर -
यंदाच्या ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीवर नजर मारा.. ऑरेंज कॅप विराट कोहली याच्याकडे आहे. तर पर्पल कॅपवर बुमराहने कब्जा मिळवला आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 11 सामन्यात 542 धावांचा पाऊस पाडला आहे. तर पर्पल कॅप म्हणजेच सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने आतापर्यंत 18 विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी सरासरी 16 इतकी आहे. बुमराहने विकेट तर घेतल्याच, त्याशिवाय धावाही रोखण्याचं काम केलेय. बुमराहनंतर दुसऱ्या क्रमांकवर पंजाबचा हर्षल पटेल आहे. त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत. पंजाबच्या संघाचीही अवस्था दैयनीय आहे.
विराट-बुमराह हिट, RCB- MI फ्लॉप
ज्या खेळाडूकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आहे, त्या खेळाडूंचा संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत तळाला आहे. विराट कोहलीच्या नावावर यंदा सर्वाधिक धावांची नोंद आहे, पण आरसीबी गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्याकडे सर्वाधिक विकेट आहेत. पण संघाची अवस्था मात्र दैयनीय आहे. मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर आहे. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. तर आरसीबी आणि पंजाब यांचं आव्हान खूपच खडतर झालेय. म्हणजेच काय तर जे खेळाडू सुपरहिट ठरले, त्यांचे संघ मात्र सुपरफ्लॉप ठरलेत.