MI vs LSG, IPL 2024 : आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सची स्थिती अधिक खराब झाली आहे. मुंबईला सातव्या पराभवाचा सामना करावा लागलाय. लखनौविरोधात आज झालेल्या सामन्यात मुंबईचा चार विकेटने पराभव झाला. या पराभवामुळे मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान अधीक खडतर झालेय. मुंबई आणि आरसीबी आता एकाच जहाजात आहेत. कारण, दोन्ही संघाचे दहा सामन्यात प्रत्येकी सहा सहा गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता दोन्ही संघाला उर्वरित सर्व सामन्यात विजय गरजेचा आहे. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागेल. 


मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून नेहाल वढेरा यानं 45 तर टीम डेविड यानं 35 धावांची खेळी केली होती. इतर फलंदाजांनी नांगी टाकली होती. मुंबईने दिलेले 145 धावांचे आव्हान लखनौने 6 विकेटच्या मोबदल्यात पार केलेय. लखनौकडून मार्कस स्टॉयनिस यानं शानादर अर्धशतक ठोकलं. त्याला केएल राहुल, दीपक हुड्डा आणि निकोलस पूरन यांनी शानदार साथ दिली. 






मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात युवा अर्शिन कुलकर्णी गोल्डन डकचा शिकार झाला. पण त्यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत धावसंख्या वाढवली. केएल राहुल यानं 22 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले. त्यानंतर दीपक हुड्डा आणि स्टॉयनिस यांनी धावसंख्या हालती ठेवली. हुड्डा यानं 18 चेंडूमध्ये दोन चौकारासह 18 धावांचं योगदान दिलं. मार्कस स्टॉयनिस यानं अर्धशतकी खेळी केली. 






मार्कस स्टॉयनिस यानं लखनौला एकहाती विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने 45 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि दोन षटकाराचा समावेश होता. निकोलस पूरन यानं 14 धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. 



मुंबईकडून हार्दिक पांड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पांड्याने चार षटकात 26 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर नुवान तुषारा, गेराल्ड कोइत्जे आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.