MS Dhoni IPL Retirement : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आयपीएल 2023 महेंद्र सिंह धोनीसाठी शेवटचा हंगाम असेल यानंतर धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही, असं बोललं जात होतं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीच्या चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता. याबाबत निवृत्तीबाबत धोनीनं कोणतीही घोषणा केलेली नव्हती पण, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत आता खुद्द धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यानं चाहत्यांना आशेचा किरण दाखवला आहे.
माही रिटायर्ड होणार?
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात विरुद्ध विजय मिळवून चेन्नई संघानं थेट अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहते पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. यंदाच्या आयपीएल दरम्यान धोनीची निवृत्ती हा एक चर्चित विषय ठरला. धोनी पुढच्या वर्षीपासून आयपीएल खेळताना दिसणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता. धोनीनं निवृत्तीबाबत सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. महेंद्र सिंह धोनीला अजूनही इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घाई नाही.
''मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन...''
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम एस धोनीनं सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याच्या रिटायरमेंटवर भाष्य केलं. यावेळी धोनीनं सांगितलं आहे की, “याबाबत निर्णय घेण्यासाठी माझ्याकड पुरेसा वेळ आहे. मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन.” पुढील आयपीएल हंगामाचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे.
धोनीनं निवृत्तीबाबत स्पष्टच सांगितलं
निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना धोनीनं म्हटलं आहे की, "सध्या मला माहित नाही, माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 8 ते 9 महिने आहेत. आतापासूनच ही डोकेदुखी का घ्यायची. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. लिलाव डिसेंबरमध्ये आहे. मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन, मग संघासोबत खेळून असो किंवा इतर काही मार्गानं."
चेन्नई आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत दाखल
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघाने 10 व्या वेळेस इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं (CSK) त्यांच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक मैदानावर गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला. इतकंच नाही तर, आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्सला सर्व गडी बाद (GT All Out by CSK) करणारा चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे.