CSK Record in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, तर चेन्नईला 5 वेळा अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2008 मध्ये पहिल्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचले, पण चेन्नईला अंतिम फेरीत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला.


यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ 20 षटकांत अवघ्या 157 धावांत सर्वबाद झाला. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह इतर फलंदाजांनी निराशा केली. मात्र, राशिद खानने शेवटच्या षटकात 16 चेंडूत 30 धावांची झटपट खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांमध्ये महिशा तिक्षणा, रवींद्र जडेजा आणि महिषा पाथिराना यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेनं ही एक गडी बाद केला.


या विजयानंतर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, गुजरात टायटन्सला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आज, 24 मे रोजी (बुधवारी) एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा प्रवास संपणार आहे. दरम्यान, या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.


2010 साली चेन्नई संघ पहिल्यांदा विजेतेपद


चेन्नई संघ आयपीएलच्या पहिल्या मोसमात म्हणजे आयपीएल 2008 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम फेरीत चेन्नईचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2010 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि यावेळी संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. आयपीएल 2010 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. याशिवाय आयपीएल 2011 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2012 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. त्याशिवाय चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2013 मध्येही अंतिम फेरी गाठली होती, पण यावेळी पुन्हा त्यांची निराशा झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएल 2013 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता.


चेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा विजेतेपद पटकावणार?


चेन्नई संघ आयपीएल 2015 च्या फायनलमध्ये पोहोचले होते, परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आयपीएल 2016 आणि आयपीएल 2017 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ खेळू शकला नव्हता. आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2019 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स संघ एका धावेनं पराभूत झाला. यानंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये पोहोचले. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावलं. आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.