MS Dhoni: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) म्हणजे, अनेक क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत. महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) अनेक चाहते आहेत. धोनीची एक झलक पाहण्यासाठी अनेक गोष्टी करताना ते नेहमीच दिसतात. धोनीनं त्याच्या बॅटनं लगावलेला षटकार पाहण्यासाठीही अनेक चाहते आतुर असतात. अशातच धोनीनं लगावलेला षटकार लाईव्ह पाहण्याचं सौभाग्य जर लाभलं तर मग बात काही औरच... सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावरुन अजुनही धोनीची किती क्रेझ आहे ते नक्कीच तुमच्या लक्षात येईल.
31 मार्चपासून आयपीएलच्या 16व्या सीझनला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच चेन्नईचं चेपॉक स्टेडियम क्रीडाप्रेमींनी खचाखच भरलेलं आहे. व्हिडीओत दिसत असलेली गर्दी पाहून तुम्हाला आयपीएलची फायनल सुरु होत असल्याचा भास होईल. पण ही कोणतीही फायनल नाही, तर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची प्रॅक्टिस सुरू आहे. आयपीएलपूर्वी महेंद्र सिंह धोनी प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
महेंद्रसिंह धोनीनं सोमवारी मैदानावर जोरदार सराव केला. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आयपीएलच्या तयारीसाठी आपापसांत सामने खेळत होते, त्यामुळे हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये आले होते. महेंद्रसिंह धोनी डगआऊटवरून फलंदाजीला येताच प्रेक्षकांच्या आवाजानं संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेलं. चेन्नई सुपर किंग्जनं सोशल मीडियावर धोनीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो काही मिनिटांतच इतका व्हायरल झाला की, महेंद्रसिंह धोनी (द ऑल टाइम ऑफ ग्रेटेस्ट) ट्विटरवर ट्रेंड करू लागला.
जेव्हा धोनीनं मैदानात घेतली एन्ट्री
धोनीनं त्याच्या धमाकेदार एंट्रीनंतर आपली बॅट फिरवली अन् एक लांबलचक षटकार मारला. मग काय... संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी… धोनी… चा आवाज घुमू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी एकीकडे प्रेक्षकांना धोनीची सर्वोत्तम फलंदाजी पाहायला मिळेल, असे चाहते कमेंट करत आहेत, तर दुसरीकडे अनेक वर्षांनी आयपीएलमध्ये धोनीचे विंटेज शॉट्स पाहण्याची आशा असल्याचे काहीजण सांगत आहेत.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जसाठी गेलं वर्ष अजिबात चांगलं नव्हतं. चार वेळा आयपीएल जिंकणारा हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. यंदा आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत धोनीच्या चेन्नईचं लक्ष गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून स्पर्धेची सर्वोत्तम सुरुवात करण्याकडेच असणार यात काहीच शंका नाही.