MI vs PBKS Hardik Pandya IPL 2025: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीसाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bengaluru) क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्सचा (Punjab Kings) पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर आता पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचे सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) झालेल्या चुका मान्य केल्या. तसेच श्रेयस अय्यरचे त्याने तोंडभरून कौतुक केले. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अप्रतिम फलंदाजी केली. श्रेयस अय्यरने या सामन्यात जोखीम पत्करली आणि त्याचा त्याला फायदा मिळाला. श्रेयस अय्यरने या सामन्यात मोठे फटके मारायला विसरला नाही आणि त्याच्यामुळेच आमचा पराभव झाला, असं हार्दिक पांड्याने मान्य केले.
पराभवानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला?
पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, आम्ही दबावाखाली चांगली कामगिरी करू शकलो नाही. योग्यवेळी योग्य गोलंदाजाचा वापर केल्यास निकाल बदलू शकला असता.खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य होती, परंतु गोलंदाजीत आमचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. मोठ्या सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करणे खूप महत्वाचे आहे, असं हार्दिक पांड्याने सांगितले. तसेच हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी देण्यावरही भाष्य केले. पंजाबला 24 बॉलमध्ये 41 धावांची गरज असताना गोलंदाजी द्यायला हवी होती का? असा प्रश्न हार्दिकला करण्यात आला. यावर हार्दिक म्हणाला की, तसं करणं घाईचं झालं असतं. मात्र बुमराहला परिस्थितीचा अंदाज असतो. बुमराहमध्ये काहीतरी खास करण्याची क्षमत आहे. परंतु आज तसे झाले नाही, असं हार्दिक पांड्याने सांगितले. दरम्यान, हार्दिक कर्णधार, फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अपयशी ठरला. हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. तर 2 षटकांत 19 रन्स दिल्या. मात्र त्यानंतरही हार्दिक बुमराहचं नाव घेण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. दरम्यान, जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 40 धावा दिल्या.
सामना कसा राहिला?
आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्जला 204 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तर म्हणून पंजाब संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण प्रभसिमरन सिंग केवळ 6 धावा काढून बाद झाला. प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिशने डाव सांभाळण्यास सुरुवात केली होती, तेव्हा प्रियांश 20 धावांची छोटी खेळी करून बाद झाला आणि पंजाबने 72 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. नेहाल वढेरा आणि श्रेयस अय्यरने डाव सांभाळताना 84 धावांची उत्तम भागीदारी केली. वढेराने 29 चेंडूत 48 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले.