PBKS vs MI IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाब किंग्सने आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने 87 धावांची नाबाद खेळी केली आणि पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली. आता 3 जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अंतिम सामना होईल. पंजाब किंग्सचा संघ आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहचला आहे. 

श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पंजाब किंग्सनं यंदाच्या आयपीएल प्लेऑफ्समधला दुसरा क्वालिफायर सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अहमदाबादच्या मैदानात पंजाबनं माजी विजेत्या मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह पंजाबनं 2014 नंतर पुन्हा एकदा स्पर्धेची फायनल गाठली आहे. या सामन्यात मुंबई पंजाबसमोर विजयासाठी 204 धावांचं मोठं लक्ष्य उभं केलं होतं. पण श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहा चेंडू राखून पार केलं. 

आधी वढेराचा कॅच सोडला, मग पंजाबने धू धू धुतला-

श्रेयसनं अवघ्या 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या. त्यानं नेहाल वढेरासह चौथ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. वढेरानं 48 धावांचं योगदान देत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे महत्वाच्याक्षणी ट्रेंट बोल्टने नेहाल वढेराचा झेल सोडला. त्यानंतर बोल्ट गोलंदाजीसाठी आल्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेराने त्याला धू धू धुतला. जसप्रीत बुमराहला देखील या सामन्यात चांगली गोलंदाजी करता आली नाही. 

आयपीएलला नवा विजेता मिळणार-

मुंबईकडून जॉनी बेअरस्टोनं 38, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवनं प्रत्येकी 44 तर नमन धीरनं 37 धावांची खेळी केली होती. दरम्यान 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होईल. महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघानी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब किंवा बंगळुरुच्या रुपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.

तब्बल 11 वर्षांनंतर पंजाबचा संघ अंतिम फेरीत-

पंजाब किंग्सने 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएल फायनल खेळला आहे. त्या हंगामात केकेआरने पंजाबला 3 विकेट्सने पराभव केला होता. श्रेयस अय्यरला जादूगार म्हणा किंवा आणखी काही, त्याने 11 वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळण्याचे पंजाबचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यरचा हा आयपीएलचा तिसरा अंतिम सामना असेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली 2020 चा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी, कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफी जिंकली आणि आता पंजाबला अंतिम फेरीत पोहचवून क्षेयस अय्यरने इतिहास रचला आहे.

संबंधित बातमी:

Shreyas Iyer News : लढाई हरलो पण युद्ध नाही, श्रेयस अय्यर नुसता बोलला नाही, तर करून दाखवलं, एकट्याने पंजाबला अंतिम फेरीत पोहचवले!