PBKS vs MI IPL 2025 Shreyas Iyer: आयपीएल 2025 च्या हंगामातील क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने (Mumbai Indians vs Punjab Kings) पराभव केला. या विजयासह पंजाब किंग्सने आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 87 धावांची नाबाद खेळी केली आणि पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जला 204 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तर म्हणून पंजाब संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण प्रभसिमरन सिंग केवळ 6 धावा काढून बाद झाला. प्रियांश आर्य आणि जोश इंग्लिशने डाव सांभाळण्यास सुरुवात केली होती, तेव्हा प्रियांश 20 धावांची छोटी खेळी करून बाद झाला आणि पंजाबने 72 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. नेहाल वढेरा आणि श्रेयस अय्यरने डाव सांभाळताना 84 धावांची उत्तम भागीदारी केली. वढेराने 29 चेंडूत 48 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले.
श्रेयस अय्यरचे 4 षटकार अन् खेळ खल्लास-
पंजाबला विजयासाठी 12 चेंडूत 23 धावांची गरज होती. मुंबईकडून अश्वानी कुमार 19 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरने षटकार टोलावला. अश्वानी कुमारचा दुसरा चेंडू नो बॉल ठरला. त्यामुळे आता विजयासाठी 11 चेंडूत 16 धावांची गरज होती. मात्र श्रेयस अय्यर 19 व्या षटकामध्येच विजय मिळवण्याचा हेतूने खेळत होता. अश्वानी कुमारच्या दुसऱ्या चेंडूवर देखील श्रेयस अय्यरने षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. परंतु पुढच्याच चेंडूवर श्रेयस अय्यरने पुन्हा षटकार टोलावत पंजाबला विजय मिळवून दिला.
तब्बल 11 वर्षांनंतर पंजाबचा संघ अंतिम फेरीत-
पंजाब किंग्सने 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला 3 विकेट्सने पराभव केला होता. श्रेयस अय्यरला जादूगार म्हणा किंवा आणखी काही, त्याने 11 वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळण्याचे पंजाबचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यरचा हा आयपीएलचा तिसरा अंतिम सामना असेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली 2020 चा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी, कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफी जिंकली आणि आता पंजाबला अंतिम फेरीत पोहचवून क्षेयस अय्यरने इतिहास रचला आहे.