IPL 2023 Lockie Ferguson : कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या अडचणी कमी होत नसल्याचे चित्र आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यातच आता केकेआरला आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज लॉकी फर्गुसन दुखापतग्रस्त झाला आहे. फर्गुसनची दुखापत कितपत गंभीर आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही? हा प्रश्न केकेआरपुढे आहे. पण फर्गुसनच्या दुखापतीमुळे कोलकाता संघाची डोकेदुखी वाढली आहे. 


न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये 25 मार्चपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वीच लॉकी फर्गुसन दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. लॉकी फर्गुसन फक्त पहिला वनडे सामना खेळणार होता, त्यानंतर तो आयपीएलसाठी रवाना होणार होता. पण तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे कोलकाता संघ अडचणीत सापडला आहे. 


हॅमस्ट्रिंगचा त्रास -


श्रीलंकाविरोधात वनडे मालिका सुरु होण्याआधी न्यूझीलंड संघाची फिटनेस चाचणी झाली. ही फिटनेस चाचणीत फर्गुसन पास करु शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हॅमस्ट्रिंगमुळे फर्गुसन वनडे सामन्याला मुकणार आहे. न्यूझीलंड संघाने फर्गुसनच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही.


शुक्रवार, 31 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. कोलकाता संघ दोन एप्रिलपासून आपल्या आयपीएल अभियानाची सुरुवात करणार आहे. त्यांची पहिली लढत पंजाब किंग्ससोबत असेल. आयपीएलला काही दिवस शिल्लक असताना अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. कोलकाता संघाला अय्यरच्या जागी नव्या कर्णधाराची घोषणा करायची आहे. कारण अय्यर आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर आहे. तो पुढील तीन ते चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. अय्यरनंतर आता लॉकी फर्गुसनच्या दुखापतीने कोलकाता संघाची डोकेदुखी वाढली आहे.  














आणखी वाचा :


संघात जागा मिळवण्यासाठी संजू सॅमसनला काय करावे लागेल? सूर्याच्या फ्लॉप शोनंतर शशी थरुर यांनी साधला निशाणा