KKR vs SRH: सनरायजर्स हैदराबादचा आठ विकेटने पराभव करत  कोलकाता नाईट रायडर्सने फायनलचे तिकिट मिळवले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 1 सामन्यात कोलकात्याने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. हैदराबादने दिलेले 160 धावांचे माफक आव्हान कोलकात्याने आठ विकेट आणि 38 चेंडू राखून सहज पार केले. कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली. हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. हैदराबादचा संघ आता 24 मे 2024 रोजी क्वालिफायर 2 सामना खेळणार आहे. राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील विजेत्या संघासोबत हैदराबाद चेन्नईमध्ये भिडणार आहे. 






कोलकात्याची वादळी सुरुवात 


हैदराबादने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने वादळी सुरुवात केली. सुनील नारायण आणि गुरबाज याने हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. 20 चेंडूमध्ये 44 धावांची भागिदारी केली. गुरबाजने 14 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये गुरबाजने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. टी नटराजन याने गुरबाजला तंबूत धाडले. त्यानंतर कमिन्सने सुनिल नारायण याला बाद केले. नारायण याने 16 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले. 


वेंकटेश अय्यर-श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके


सलामी फलंदाज माघारी गेल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार फलंदाजी केली. त्यांना हैदराबादच्या फिल्डर्सनी साथ दिली. अय्यरचे दोन झेल सोडले. त्याचा पूर्ण फायदा अय्यरने केला. श्रेयस अय्यरने अवघ्या 24 चेंडूत 241 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 58 धावांची खेळी केली. अय्यरने आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि पाच चौकार ठोकले. वेंकटेश अय्यर यानेही नाबाद अर्धशतक ठोकले. वेंकटेश अय्यरने 28 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चार षटकार आणि पाच चौकार ठोकले. वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत 38 चेंडू राखून कोलकात्याला विजयी केली. कोलकात्याने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 26 मे रोजी चेन्नईमध्ये ते चषकासाठी मैदानात उतरतील. 







हैदराबादची खराब गोलंदाजी - 


160 धावांचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. कोलकात्याच्या फलंदाजांनी हैदराबादची गोलंदाजी फोडली.  हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि नटराजन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार, विजयकांत, ट्रेविस हेड आणि रेड्डी यांना एकही विकेट मिळाली नाही.