KKR vs SRH:  मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची भक्कम फलंदाजी कोसळली. सनरायजर्स हैदराबादचा डाव 159 धावांत संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने तीन तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने 55 धावांची खेळी केली. पॅट कमिन्स आणि हेनरिक क्लासेन यांनी छोटेखानी खेळी केली. कोलकात्याला 160 धावांचे आव्हान मिळालेय. क्वालिफायर 1 चा विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे, तर पराभूत संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळणार आहे.


हैदराबादची सुरुवात खराब -


अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पण कोलकात्याच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं दाखवून दिले. पॉवरप्लेमध्येच हैदराबादचे दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. 39 धावांतच हैदराबादने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. मिचेल स्टार्क,  वैभव अरोरा यांच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. पण मराठमोळ्या राहुल त्रिपाठीने एकट्याने झुंज दिली. 


हैदराबादचे दिग्गज फेल -


मिचेल स्टार्क याने पहिल्याच षटकात धोकादायक ट्रेविस हेड याला तंबूत पाठवले. ट्रेविस हेड याचा स्टार्कने अप्रतिम चेंडूवर त्रिफाळा उडवला. हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माही फार काळ  टिकू शकला नाही. अभिषेक शर्मा फक्त तीन धावा काढून तंबूत परतला. अभिषेक शर्माला वैभव अरोरा याने रसेलकरवी झेलबाद केले. नितीश रेड्डीही फार काळ मैदानात टिकू शकला नाही. रेड्डी 10 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. रेड्डी आणि शाहबाद अहमद यांना स्टार्क याने एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. शाहबाज अहमद याला खातेही उघडता आले नाही. 5 षटकांमध्ये हैदाराबादने 39 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट गमावल्या होत्या. 


क्लासेनची छोटेखानी खेळी -


39 धावांत चार आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर राहुल त्रिपाठी याने हेनरिक क्लासेन याच्यासोबत हैदराबादच्या डावाला आकार दिला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. पण वरुण चक्रवर्ती याने क्लासेन याचा अडथळा दूर केला. हेनरिक क्लासेन याने 21 चेंडूमध्ये एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 32 धावांची छोटेखानी खेळी केली. क्लासेन तंबूत परतल्यानंतर राहुलही लगेच बाद झाला. 


त्रिपाठीचा झंझावत, अर्धशतक ठोकले -


हैदराबादची फलंदाजी ढेपाळल्यानंतरही राहुल त्रिपाठी याने शानदार फलंदाज केली. त्याने कोलकात्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने हैदराबादची धावसंख्या वाढवली. राहुल त्रिपाठी याला कोणताही गोलंदाज बाद करु शकला नाही, तो धावबाद झाला. राहुल त्रिपाठी याने 35 चेंडूमध्ये 55 धावांची झंझावती खेळी केली.  या खेळीमध्ये त्रिपाठी याने एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश आहे. 



पॅट कमिन्सचा फिनिशिंग टच - 


अब्दुल समद लयीत होता. त्याने दोन षटकार ठोकत प्रभावित केले. पण गरज नसताना मोठा फटका मारला अन् बाद झाला. अब्दुल समद याने 12 चेंडूमध्ये 16 धावांची खेळी केली. समद बाद झाल्यानंतर सनवीर सिंह याला खातेही उघडता आले नाही. सनवीर सिंह याला इम्पॅक्ट पाडता आला नाही.  भुवनेश्वर कुमारही फारकाळ मैदानावर टीकू शकला नाही. भुवनेश्वर कुमारला वरुण चक्रवर्ती याने बाद केले. अखेरीस पॅट कमिन्स याने फिनिशिंग टच दिला. पॅट कमिन्स याने 30 धावांची शानदार खेळी केली. कमिन्सने 24 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन षटकार आणि दोन चौकार ठोकले. 


कोलकात्याचा भेदक मारा, स्टार्क चमकला -


नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिचेल स्टार्क याने आग ओखणारी गोलंदाजी केली. स्टार्क याने हैदराबादच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय वरुण चक्रवर्ती याने दोन विकेट घेतल्या. आंद्रे रसेल, सुनील नारायण, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.