IPL 2025 : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. चेन्नईने 14 सामन्यात 14 गुणांची कमाई करत पाचव्या स्थानापर्यंत झेप घेतली. पण त्यांना प्लेऑपमध्ये पोहचता आले नाही. आता चेन्नईकडून आयपीएल 2025 ची तयारी सुरु कऱण्यात आली असेलच. पुढील हंगामाआधी मेगा लिलाव पार पडणार आहे. ठरावीक खेळाडूंना कायम ठेवत सर्वांनाच रिलिज करावे लागणार आहे. 2025 आयपीएल आधी मेगा लिलाव पार पडणार आहे. चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा बीसीसीआयचा नियम आहे, सध्या प्रत्येक संघाने आठ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी मागितली आहे. पण सध्या तरी चार खेळाडू कायम ठेवले जातील. आयपीएल 2025 मध्ये चेन्नई कोणत्या चार खेळाडूंना कायम ठेवू शकते, त्याबाबत जाणून घेऊयात... 


ऋतुराज गायकवाड


आयपीएल 2024 आधी एमएस धोनीनं चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवले. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचता आले नाही, पण कामगिरी सरासरीपेक्षा नक्कीच चांगली झाली आहे. ऋतुराज गायकवाड अनुभवातून चांगला कर्णधार होईल, असाच सर्वांना विश्वास आहे. त्यानुसार, चेन्नई कर्णधार ऋतुराज गायकवाड याला रिटेन केले जाईल. धोनीचा वारसा चालवणाऱ्या ऋतुराज गायकवाड यानं यंदा खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. त्याने 14 सामन्यात 583 धावांचा पाऊस पाडला, यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. ऋतुराज गायकवाडला चेन्नई सध्या प्रत्येक हंगामासाठी सहा कोटी रुपये देत आहे.


रवींद्र जडेजा


रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्स यांचं एक वेगळेच कनेक्शन झालेय. जाडेजा 2012-2015 आणि 2018 ते 2024 पर्यंत चेन्नईसाठी खेळत आहे. आयपीएल 2024 मध्ये महत्वाच्या सामन्यात जाडेजाला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. पण गतवर्षी जाडेजानं विनिंग शॉट मारत चेन्नईला चषक जिंकून दिला होता. जाडेजानं यंदा गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी केली. त्याने फलंदाजीत 267 धावा तर गोलंदाजीत 8 विकेट घेतल्या आहेत. जाडेजाला चेन्नई 16 कोटी रुपये देते.  


शिवम दुबे


चेन्नईमध्ये आल्यानंतर शिवम दुबे याच्या करिअरने वेग घेतला. चेन्नईसाठी दुबे याने आक्रमक फलंदाजी केली. त्याला टीम इंडियाचे तिकिटही मिळाले. दुबे याने चेन्नईसाठी 41 सामन्यात 1103 धावा चोपल्या आहेत.  फिनिशर आणि पॉवर हिटर म्हणून शिवम दुबे याने आतापर्यंत प्रभावी मारा केला आहे. यंदाच्या हंगामात 14 सामन्यात त्याने 396 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये षटकारांची संख्या सर्वाधिक आहे. आयपीएल 2025 आधी शिवम दुबे याला चेन्नईचा संघ सोडण्याची रिस्क नाही. त्याला कायम ठेवलं जाईल. दुबेसाठी चेन्नईचा संघ प्रत्येक हंगामात 4 कोटी रुपये खर्च करतो.  


मथीशा पाथिराना


मथीशा पाथिराना स्वत:च चेन्नई सुपर किंग्सला कुटुंबासारखा मानतो.  धोनीलाही तो वडिलांसारखे मानतो. पथिराना याच्यासाठी चेन्नई किती महत्वाची आहे, हे त्यावरुनच स्पष्ट जाणवते. चेन्नई सुपर किंग्सचं मॅनेजमेंटही पथिराना याला रिलिज करणार नाही. कारण, मागील दोन हंगामात त्याने शानदार गोलंदाजी केली.त्याने 18 सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत. नव्या आणि जुन्या चेंडूवर तो भेदक मारा करतो. त्याच्यापुढे दिग्गज फलंदाजही नांगी टाकतात. पथिराना याला चेन्नई रिटेन करेल, असा अंदाज आहे. पथिरानासाठी चेन्नई फक्त 20 लाख रुपये मोजत आहे.