KKR Charter Flight Diverted : कोलकाता नाईट रायडर्सची फ्लाईट लखनौवरुन कोलकात्यामध्ये उतरण्याऐवजी गुवाहाटीमध्ये उतरवण्यात आली. खराब वातावरणामुळे फ्लाईट डायव्हर्ट करावी लागली. त्यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोड्यावेळासाठी भितीचं वातावरण होतं. पण गुवाहाटीमध्ये फ्लाईट व्यवस्थित उतरल्यानंतर चेहऱ्यांवर आनंद दिसून आला. वातावरण व्यवस्थित झाल्यानंतर गुवाहाटीवरुन फ्लाईट कोलकात्याकडे नेहण्याचा प्रयत्न केला, पण खराब वातावरणामुळे फ्लाईट वाराणसीकडे वळवण्यात आली. त्यानंतर आज फ्लाईट कोलकात्यामध्ये दाखल झाली. सर्व खेळाडूंनी कोलकात्यामध्ये दाखल झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. कोलकात्यामध्ये खेळाडू हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे सर्व खेळाडूंना गुवाहाटीमध्ये दोन तासांपेक्षा जास्त काळ थांबावं लागलं.
कोलकात्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस -
सोमवारी कोलकात्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाट्यसह पाऊस कोसळत होता. खराब वातावरणामुळे कोलकाता विमानतळ बंद करण्यात आले होतं. कोलकाता विमानतळावर कोणताही फ्लाईट लँड करण्यात अथवा टेकऑफ बंद करण्यात आले होते. त्यामुळे कोलकात्याकडे येणाऱ्या फ्लाईट दुसऱ्या विमानतळावर डायव्हर्ट करण्यात आल्या. कोलकाता नाईट रायडर्सची चार्टर फ्लाईटही कोलकात्याऐवजी गुवाहाटीकडे वळवण्यात आली. गुवाहाटीमध्ये दोन तासांची विश्रांती घेतल्यानंतर फ्लाईट पुन्हा निघाली, पण वाराणसीला लँड करण्यात आली. वाराणसीमध्ये खेळाडूंनी विश्रांती केल्यानंतर आज चार्टर फ्लाईट कोलकात्यामध्ये दाखल झाली आहे.
कोलकात्याचं प्लेऑफमधील स्थान निश्चित -
ईकाना स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाइट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सचा 98 धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह कोलकात्यानं प्लेऑफच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलेय. कोलकात्यानं 11 सामन्यात आठव्या विजयाची नोंद केली आहे. 16 गुणांसह कोलकाता सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाइट रायडर्सचं प्लेऑफमधील आव्हान अधीक भक्कम झालेय. राजस्थान रॉयल्सही 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई 12 गुणांसह तिसऱ्या तर हैदराबाद 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.