KKR vs DC Match Report : फिलिप सॉल्टच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर कोलकात्यानं दिल्लीचा सात विकेटनं पराभव केला. दिल्लीनं दिलेले 154 धावांचे आव्हान कोलकात्यानं सात विकेट आणि 21 चेंडू राखून सहज पार केले. कोलकात्याकडून फिलिप सॉल्ट यानं वादळी अर्धशतक ठोकलं. त्यानं 33 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. कोलकात्यानं यंदाच्या हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली. 12 गुणांसह कोलकाता संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. कोलकात्यानं प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलेय. दिल्लीकडून आज फलंदाजांनी निराश केले, तर गोलंदाजीमध्ये फक्त अक्षर पटेल यानेच भेदक मारा केला, इतरांना अपयश आले. 


दिल्लीने दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्यानं वादळी सुरुवात केली. फिलिप सॉल्ट आणि सुनिल नारायण यांनी पॉवरप्लेमध्ये 79 धावा लुटल्या. सॉल्ट यानं चौफेर फटकेबाजी करत कोलकात्याचा विजय निश्चित केला. सॉल्ट यानं फक्त 33 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्यानं सात चौकार आणि पाच षटकार ठोकले. सुनिल नारायण यानं 10 चेंडूमध्ये तीन चौकाराच्या मदतीने 15 धावांचे योगदान दिले. नारायण बाद झाल्यानंतर कोलकात्यानं रिंकू सिंह याला बढती दिली. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. रिंकू सिंह यानं 11 चेंडूमध्ये एका षटकाराच्या मदतीने 11 धावांचेच योगदान दिले. 100 धावांवर कोलकात्याला तिसरा धक्का बसला, पण तोपर्यंत सामना दिल्लीच्या हातून निसटला होता. 






दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रिंकू सिंह बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकू बाद झाला तेव्हा कोलकात्याला विजयासाठी 64 चेंडूमध्ये 54 धावांची गरज होती. कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी आणखी विकेट न पडू देता कोलकात्याला सहज विजय मिळवून दिला. कर्णधार श्रेयस अय्यर यानं 23 चेंडूत 33 धावा चोपल्या. तर वेंकटेश अय्यर यानं 23 चेंडूमध्ये 26 धावांचे योगदान दिलं. श्रेयस अय्यर यानं एक षटकार आणि तीन चौकार लगावले तर वेंकटेशने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. 


दिल्लीकडून फक्त अक्षर पटेल यानेच भेदक मारा केला. अक्षर पटेल यानं चार षटकात फक्त 25 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. तर लिझाड विल्यमस यानं एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना निराशा मिळाली. दिल्लीच्या फिल्डर्सनेही आज खराब फिल्डिंग केली. झेल सोडल्यामुळे कोलक्याच्या फलंदाजांना जीवनदान मिळाले. परिणाणी कोलकात्यानं सहज सामन्यात बाजी मारली.