What Is Drop In Pitch : टी20 विश्वचषकाचा थरार एक जूनपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच, विश्वचषकाच्या महासंग्रामाला फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. विश्वचषकाची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी विशेष तयारी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खास ड्रॉप इन खेळपट्टीवर होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथून ‘ड्रॉप-इन खेळपट्टी’ आणण्यात आली आहे. पण ही ड्रॉप इन खेळपट्टी कशी असले, त्याबद्दल तुम्हाला माहितेय का? या खेळपट्टीची खासियत नेमकी काय आहे? सध्या सोशल मीडियावर ड्रॉप इन खेळपट्टीचीच चर्चा सुरु आहे. आपण जाणून घेऊयात ड्रॉप इन खेळपट्टी म्हणजे नेमकं काय, त्याची खासियत काय..
ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे काय? What Is Drop In Pitch
ड्रॉप-इन खेळपट्टी ही मैदान किंवा त्या ठिकाणापासून दूर तयार केली जाते, त्यानंतर स्टेडियममध्ये आणून बसवली जाते. त्यामुळे एकाच मैदानाचा वापर विविध खेळांसाठी करता येतो. अनेक देशांमध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर केला जातो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्क येथे होणार आहे. त्यासाठी ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. ड्रॉप इन खेळपट्टी ऑस्ट्रेलियातून मागवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना न्यूयॉर्कमदील नासाऊ काउंटी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना ड्रॉप-इन खेळपट्टीवर होईल. क्रिकेटमध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी खेळपट्टीचा वापर ऑस्ट्रेलियात वर्ल्ड सिरिज क्रिकेटसाठी पर्थच्या क्यूरेटर जॉन मैल यांनी तयार केली होती. 1970 मध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी पहिल्यांदा वापरण्यात आली होती.
ड्रॉप-इन खेळपट्टीची खासियत काय ?
ड्रॉप-इन खेळपट्टी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेहता येते. विशेष म्हणजे, सामना सुरु होण्याआधी फक्त 24 तास ही खेळपट्टी स्टेडियममध्ये बसवली जाऊ शकते. सामना संपल्यानंतर ड्रॉप-इन खेळपट्टी लगेच काढताही येते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे ड्रॉप-इन खेळपट्टी लोकप्रिय आहे. एकच मैदानाचा वापर वेगवेगळ्या खेळासाठी केला जातो. क्रिकेटसाठी मैदान वापरताना ड्रॉप-इन खेळपट्टी बसवली जाते. आता टी20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याशिवाय न्यूयॉर्कच्या मैदानावरील इतर सामनेही याच खेळपट्टीवर होणार आहेत.