IPL 2024, MI vs KKR LIVE Score:  जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा यांच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली. कोलकात्यानं प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या. कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर यानं 70 तर मनिष पांडे यानं 42 धावांचं योगदान दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या.


मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याचा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नुवान तुषाराने सुरुवातीलाच कोलकात्याला जोरदार धक्के दिले. कोलकात्याची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. तुषाराच्या माऱ्यापुढे कोलकात्याचं फलंदाज ढेपाळले. फॉर्मात असलेला फिलिप सॉल्ट आणि नारायण यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सॉल्ट फक्त पाच धावा काढून बाद झाला. तर सुनिल नारायण याला फक्त आठ धावांचं योगदान देता आलं. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रघुवंशी याला फक्त 13 धावा करता आल्या. त्यानं सहा चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने 13 धावा केल्या. 


आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी होती, पण त्याला कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना आली नाही. त्याला फक्त सहा धावाच करता आल्या. अय्यर सहा धावा काढून तुषाराच्या चेंडूवर बाद झाला. रिंकू सिंह याचा अडथळा पियुष चावलाने दूर केला. रिंकू सिंह फक्त नऊ धावांचं योगदान देऊ शकला. कोलकात्यानं 57 धावात पाच फलंदाज गमावले होते. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरवण्यात आले. 


मनिष पांडे यानं आपला अनुभव पणाला लावत कोलकात्याचा डाव सावरला. मनिष पांडेने वेंकटेश अय्यर याच्यासोबत शानदार भागिदारी केली. मनिष पांडे आणि वेंकटेश अय्यर यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला. मनिष पांडे यानं 31 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकाराचा समावेश होता. मनिष पांडे आणि वेंकटेश अय्यर यांच्यामध्ये 84 धावांची शानदार भागिदारी झाली, हार्दिक पांड्यानं ही जोडी फोडली. 


मनिष पांडे बाद झाल्यानंतर कोलकात्याची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. आंद्रे रसेल, रमणदीप आणि मिचेल स्टार्क स्वस्तात तंबूत परतले. मिचेल स्टार्कला खातेही उघडता आले नाही. रसेल सात धावा काढून धावबाद झाला, तर रमणदीपला बुमराहने तंबूत धाडले. एका बाजूला विकेड पडत असताना वेंकटेश अय्यर यानं कोलकात्याच्या डावाला आकार दिला. त्यानं 70 धावांची शानदार खेळी केली. वेंकटेश अय्यरने 52 चेंडूमध्ये 70 धावांचं योगदान दिलं. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकाराचा समावेश आहे. 



मुंबईकडून जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा आणि हार्दिक पांड्या यांनी भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहने 18 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना बाद केले. नुवान तुषारा यानेही तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या. तर पियुष चावला याला एक विकेट मिळाली.