IPL 2024, RR vs RCB : राजस्थानने आरसीबीचा सहा गडी आणि पाच चेंडू राखून पराभव करत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सलामी फलंदाज जोस बटलर याचं वादळी शतक किंग विराट कोहलीच्या संथ शतकावर भारी ठरलं. जोस बटलरने खणखणीत षटकार मारत राजस्थानला विजय मिळवून दिलाच, त्याशिवाय स्वत:चं शतकही पूर्ण केले. जोस बटलर याच्या शतकानंतर हेटमायरने केलेले सेलेब्रिशनही चर्चेचा विषय आहे. बटलरने षटकार मारतच हेटमायरने हवेत उडी मारत संघाचा विजय अन् शतकाचं सेलिब्रेशन केले. सामन्यानंतर विराट कोहलीनेही जोस बटलरच्या शतकी खेळीचं कौतुक केले. राजस्थानविरोधात विराट कोहलीनेही शतकी खेळी केली, पण जोस बटलर याची खेळी विराट कोहलीपेक्षा शानदार ठरली. 






दोन शतकं, विराट अन् बटलरचा झंझावात - 


राजस्थानविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केली. पण यासाठी विराट कोहलीने 67 चेंडू घेतले. विराट कोहलीचं आयपीएलमधील हे आठवे शतक ठरलं. सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला. पण विराट कोहलीचे हे विक्रमी शतक आयपीएलमधील सर्वात संथ शतक ठरलं. विराट कोहलीने मनिष पांडेच्या संथ शतकाची बरोबरी केली. मनिष पांडे 2009 मध्ये दिल्लीविरोधात 67 चेंडूमध्ये शतक ठोकले होते. विराट कोहलीने या संथ शतकी खेळीची बरोबरी केली. 


विराट कोहलीने राजस्थानविरोधात 72 चेंडूमध्ये नाबाद 113 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार आणि चार षटकाराचा समावेश होता.आरसीबीच्या दुसऱ्या फलंदाजांकडून साथ मिळाली नाही, त्यामुळेच विराट कोहलीची खेळी संथ ठरली.






जोस बटलर यानं धावांचा पाठलाग करताना संथ सुरुवात केली. पण त्यानंतर त्यानं आक्रमक रुप धारण केले. जोस बटलर यानं 6 व्या षटकांपासून आक्रमक रुप घेतलं. बटलरने 58 चेंडूमध्ये 100 धावांची खेळी केली. यामध्ये चार षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. जोस बटलरला संजू सॅमसनकडून साथ मिळाली. संजू सॅमसन यानं 69 धावांची खेळी केली. जोस बटलरचा संजूनं साथ दिल्यामुळे राजस्थानच्या विजयाचा पाया रचला गेला. शानदार शतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 





आरसीबीचा सलग तिसरा पराभव - 


जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थानने आरसीबीचा सहा विकेट राखून पराभव केला. आरसीबीने दिलेले 184 धावांचे आव्हान राजस्थानने चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. जोस बटलरने शतक ठोकले तर संजूने अर्धशतकी खेळी केली. राजस्थानने यंदाच्या आयपीएलमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. तर आरसीबीचा सलग तिसरा पराभव झाला.