Ishant Sharma, IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) हंगामातील पहिल्याच सामन्यात दिल्लीला (DC) डबल धक्का बसला आहे. 23 मार्च रोजी पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात पंजाबनं सहा विकेटनं विजय मिळवला. दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 174 धावांचा डोंगर उभारला होता. पण प्रत्युत्तरदाखल पंजाबने हे आव्हान सहज पार केले. हा सामना तर दिल्लीने गमावलाच, पण त्यांना आणखी एक धक्का बसलाय. दिल्लीचा प्रमुख गोलंदाज ईशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला. आधीच सामना गमावला, त्यात ईशांत शर्माही दुखापतग्रस्त झाला. 175 धावा रोखताना दिल्लीकडून ईशांत शर्मानं भेदक मारा केला. ईशांत शर्मा यानं एक विकेटही घेतली, त्याशिवाय जॉनी बेयरस्टो याला धावबादही केले. पण फिल्डिंग करताना पाय मुरगळला अन् इशांत शर्माला मैदानात जावं लागलं. महत्वाचा गोलंदाज मैदानाबाहेर गेल्यामुळे दिल्लीकडे गोलंदाजीचे पर्यायही शिल्लक राहिले नाहीत. त्याचा फटकाही त्यांना बसला.


IPL 2024 मधून ईशांत शर्मा बाहेर ?


ईशांत शर्मा याची दुखापत गंभीर असल्याचं दिसतेय. त्यामुळे तो आयपीएलमधून बाद होणार का? अशी चर्चा सुरु झाली. फिल्डिंग करताना ईशांत शर्माला दुखापत झाली. चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळल्याचं दिसलं. मेडिकल टीमच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला. सहाव्या षटकावेळी हा प्रसंग घडला. दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. एक्सरे काढल्यानंतरच याबाबतची माहिती समोर येईल. तो काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. किंवा पूर्ण हंगामातूनही बाहेर जाऊ शकतो. कारण, विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या असाच दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो स्पर्धेला मुकला होता. अशा स्थितीत इशांतची ही दुखापत मोठी ठरू शकते आणि तो अनेक सामन्यांतून किंवा संपूर्ण स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो.दिल्लीकडून लवकरच ईशांत शर्माबाबत अपडेट दिली जाईल. 
 
ईशांत शर्माकडून भेदक मारा - 


दुखापतग्रस्त होण्याआधी ईशांत शर्मानं षटकं गोलंदाजी केली होती.  ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती.  त्याने पंजाबचा कर्णधार शिखर धवनला तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याशिवाय गोलंदाजीवेळी फॉलोथ्रोवेळी जॉनी बेअरस्टोला धावबाद केले होते. ईशांत शर्मानं 2 षटकात 16 धावा दिल्या होत्या.  आता  मात्र त्याच्या पुनरागमनाची किंवा दुखापतीची अपडेट कधी मिळते याची चिंता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला लागून राहिली आहे.


ऋषभ पंतनं सांगितलं पराभवाचं कारण - 


पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऋषभ पंत यानं खंत व्यक्त केली. त्याशिवाय या पराभवाचं कारणही त्यानं सांगितलं. ईशांत शर्मा दुखापतग्रस्त जाल्यामुळे एक गोलंदाज शॉर्ट राहिला, त्याचा आम्हाला फटका बसला, असे पंत म्हणाला. सामन्यानंतर बोलताना ऋषभ पंत म्हणाला की,  ईशांत शर्माची दुखापत मैदानात स्पष्ट दिसत होती. पण आमच्याकडे एक गोलंदाज शॉर्ट होता. कारण आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. त्यामुळे अभिषेक पोरेलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरावं लागलं. त्याने शेवटच्या षटकात ठोकलेल्या धावांमुळे सामन्यात रंगत आली. पण आमच्याकडे एक बॉलर शॉर्ट होता.