MI vs LSG, IPL 2024 : लखनौमधील एकाना स्पोर्टर्स स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 मधील 48 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव झाला. लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सचा चार विकेट राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सच्याया कामगिरीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर ऑलराऊंडर इरफान पठाणनं (Irfan Pathan) परखड भाष्य केलंय. इरफान पठाणनं मुंबई इंडियन्सच्या पराभवांच्या मालिकेला हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) चुकांना जबाबदार धरलं आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये सातवा पराभव झाला.
मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटच्या मोबदल्यात 144 धावा केल्या होत्या. लखनौच्या गोलंदाजांनी मुंबईला सुरुवातीला धक्के दिल्यानंतर नेहाल वढेरा यानं 45 आणि टीम डेविड यानं 35 धावा करत डाव सावरला. लखनौनं मुंबईनं दिलेलं आव्हान 6 विकेटच्या मोबदल्यात पार केलं. मार्क स्टॉयनिसची अर्धशतकी खेळी, केएल राहुल, दीपक हुड्डा आणि निकोलस पूरन यांच्या खेळीनं लखनौच्या विजयाचा मार्ग सुकर केला. लखनौ सुपर जाएंटसनं 19 व्या ओव्हरमध्ये विजयाला गवसणी घातली. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील आणखी एक पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानं मुंबईच्या या स्थितीला हार्दिक पांड्याच्या चुकांना जबाबदार धरलं आहे.
इरफान पठाण काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर इरफान पठाण म्हणतो, मुंबई इंडियन्सची टीम गेल्या वर्षी क्वालिफाई करु शकली नव्हती कारण पूर्ण हंगामात जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. मात्र, यावेळी तो संघात असून देखील ही स्थिती आहे. मैदानावर संघाचं व्यवस्थापन योग्यपणे केलं जात नसल्यानं ही स्थिती ओढवली आहे. कॅप्टन हार्दिक पांड्यानं अनेक चुका केल्या आहेत आणि हेच सत्य आहे, असं इरफान पठाण म्हणाला.
मुंबई इंडियन्सनं यंदा रोहित शर्माच्या जागी नेतृत्त्वाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. हार्दिक पांड्याला मैदानांवर प्रेक्षकांकडून शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. याचा परिणाम देखील हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर झालेला दिसतो. हार्दिकनं 10 मॅचमध्ये 21.88 च्या सरासरीनं 197 धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सचा सातवा पराभव
मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएल मधील सातवा पराभव झाला. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत केवळ तीन मॅचेसमध्ये विजय मिळवता आलेला आहे. मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून त्यांची प्लेऑफसची वाट खडतर झाली आहे.
संबंधित बातम्या :
MI Playoff Chances : 7 पराभवानंतर मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान संपलं? जाणून घ्या MI ची संधी
मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं आव्हान खडतर, 10 सामन्यात सातव्या पराभवाची नोंद