IPL Marathi Captain : अवघ्या 48 तासांमध्ये आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये चेपॉकवर सलामीचा सामना रंगणार आहे. सलामीच्या सामन्याआधीच चेन्नईच्या संघात मोठा बदल झालाय. एमएस धोनीनं युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे. पुणेकर ऋतुराज आयपीएलमधील 52 सामन्यानंतर एखाद्या संघाची धुरा संभाळणार आहे. पण आयपीएलमध्ये नेतृत्व संभाळणारा ऋतुराज गायकवाड सहावा मराठी खेळाडू आहे.  याआधी अनेक दिग्गजांनी आयपीएलमध्ये कर्णधारपद संभाळले आहे. यामध्ये काहींना यश आलं तर काही अपयशी ठरले. रोहित शर्मा सर्वात यशस्वी मराठी कर्णधार ठरलाय. पाहूयात आयपीएलमध्ये आतापर्यंत कोण कोणत्या मराठी खेळाडूंनी कर्णधारपद संभाळलं आहे.


सचिन तेंडुलकर - 


क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर यानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा संभाळली. सचिन तेंडुलकर आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून मुंबईचाच सदस्य राहिलाय. तो आयकॉन खेळाडू म्हणून मुंबईच्या ताफ्यात होता. त्याच्याकडे मुंबईची धुरा सोपवण्यात आली होती. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी 51 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यामध्ये 30 सामन्यात मुंबईचा विजय झाला तर 21 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सचिन तेंडुलकर यानं काही काळानंतर मुंबईचं कर्णधारपद सोडलं होतं. 


झहीर खान - 


भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यानं आयपीएलमध्ये विविध संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्यानं आयपीएलमध्ये कर्णधारपदही संभाळलं, हे खूप कमी जणांना माहित असेल. झहीर खान यानं 2016-17 च्या आयपीएल हंगामात दिल्लीची धुरा संभाळली होती. झहीर खान यानं आयपीएलमध्ये 23 सामन्यात कर्णधारपद संभाळलं होतं. यामध्ये 10 सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर 13 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 
 
रोहित शर्मा - 


आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये रोहित शर्माची निवड होते. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल चषक जिंकून दिली आहेत. 2013 च्या मध्यात त्याच्याकडे कर्णधारपद आले होते. 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्मानं मुंबईची धुरा संभाळली होती. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 158 सामन्यात नेतृत्व केले. यामध्ये मुंबईचा 87 सामन्यात विजय झाला तर 67 सामन्यात पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषकावर नाव कोरले. 


अजिंक्य रहाणे - 


मराठमोळा अजिंक्य रहाणे सध्या चेन्नईच्या ताफ्यात आहे. त्याआधी तो राजस्थान आमि पुणे सुपर जायंट्स संघाचाही सदस्य राहिलाय. या दोन्ही संघाचं त्यानं कर्णधारपद भूषवलं आहे. राजस्थान संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणे यानं 25 सामन्यात नेतृत्व केले. यामध्ये 9 सामन्यात विजय आणि 16 सामन्यात पराभवा झाला.  


श्रेयस अय्यर -


श्रेयस अय्यर यंदाच्या हंगामात केकेआरचा कर्णधार आहे. याआधी तो दिल्लीचा कर्णधार होता. अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने समाधानकारक कामगिरी केली होती. यंदा अय्यर कोलकात्यासाठी कसं नेतृत्व करतोय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 


सूर्यकुमार यादव - 


स्काय अर्थात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा महत्वाचा सदस्य आहे. सूर्यकुमार यादव याला आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची जास्त संधी मिळाली नाही. 2023 मध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्यानं एका सामन्यात मुंबईचं नेतृत्व संभाळलं होतं. त्यामध्ये मुंबईने विजय मिळवला होता. 


ऋतुराज गायकवाड -


एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाड हा सीएसकेचा नवीन कर्णधार असणार आहे. ऋतुराज गायकवाड याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रवींद्र जाडेजा याच्याकडे चेन्नईनं धुरा दिली होती, पण त्यावेळी अपयश आले होते. आता ऋतुराज गायकवाड काय करिश्मा करतो, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.