चेन्नई : भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत असतात ती आयपीएल स्पर्धा (IPL 2024)उद्यापासून सुरु होत आहे. आयपीएलमधील सुरुवातीची लढत  महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या निमित्तानं जुनी आकडेवारी पाहिली असता चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमनं प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, सन रायजर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्सनं एकदा विजेतेपद पटकावलं आहे.


मुंबईच्या नावावर पाच विजेतेपद


मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिलं विजेतेपद मिळवण्यासाठी 2013 पर्यंत वाट पाहावी लागली. रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्या वर्षी मुंबईच्या कॅप्टनपदाची जबाबदारी  स्वीकारली होती. मुंबईनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं.चेन्नई सुपर किंग्जनं देखील महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात पाचवेळा विजेतेपद मिळवलं आहे. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं 2010,2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजय मिळवला होता. 


आयपीएलच्या 2008 मधील पहिल्या पर्वाचं विजेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्त्वातील राजस्थान रॉयल्सनं मिळवलं होतं.2009 चं आयपीएल लोकसभा निवडणुकीमुळं परदेशात खेळवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलचं विजेतेपद डेक्कन चार्जर्सनं मिळवलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 मध्ये विजेतपद मिळवलं होतं. सनरायजर्स हैदराबादनं 2016 आणि गुजरात टायटन्सनं 2022 च्या स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं. 


सहावेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तो खेळाडू नेमका कोण?


आयपीएल 2008 पासून सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 16 वेळा स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेत सहावेळा विजेतेपद मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. हा खेळाडू डेक्कन चार्जर्स आणि  मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे. या खेळाडूचं नाव रोहित शर्मा असं आहे. रोहित शर्मानं 2008 ते 2010 पर्यंत डेक्कन चार्जर्स या टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्त्वातील टीमनं 2009 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. रोहित शर्मा त्या टीममध्ये महत्त्वाचा भाग होता. रोहितनं 362 धावा केल्या होत्या आणि 11 विकेट देखील घेतल्या होत्या. रोहित शर्मानं त्यावेळी हॅट्र्रिक केली होती.  


डेक्कन चार्जर्सच्या टीममध्ये असतानाचं विजेतेपद आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून पाच सीझनचं विजेतेपद असं एकूण सहा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम फक्त रोहित शर्माच्या नावावर आहे.   दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सहावं विजेतेपद मिळवून देणार का याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईची पहिली लढत गुजरात टायटन्ससोबत 24 मार्चला होणार आहे. 


संबंधित बातम्या :


Rohit Sharma : गुड न्यूज, रोहित शर्माची सराव सत्रात फटकेबाजी, बॉलर्सचं टेन्शन वाढणार, पाहा व्हिडीओ


उद्यापासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम; चेपॉक सज्ज, ए.आर. रहमानसह कोण परफॉर्मन्स करणार?, जाणून घ्या