Hardik Pandya Mumbai Indians Captain : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्याप सूर सापडेलला नाही. मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर राजस्थानविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या (IPL hardik pandya) नेतृत्वात मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा (ROHIT SHARMA) कर्णधार असताना मुंबईने अनेकदा कमबॅक केले आहे, पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात कमबॅक होईल का? याची चर्चा सुरु आहे. रोहित शर्माला पुन्हा मुंबईचं कर्णधारपद देणार, आशा चर्चेला जोर धरला आहे. यामध्येच आता माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. क्रिकबजच्या क्रिकेट कार्यक्रमात मनोज तिवारी यानं रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईची धुरा सोपवली जाऊ शकते, असा दावा केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


हार्दिक पांड्याला गुजरातच्या संघाकडून मुंबईने ट्रेड केले होते. हार्दिक पांड्याने गुजरातला दोन हंगामात फायनलमध्ये नेलं होतं, त्यामध्ये एकवेळा चषक उंचावला आहे. हार्दिक पांड्याचं नेतृत्वगुण पाहून मुंबईने त्याला ट्रेड केले. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढल्याचं चाहत्यांना रुचलं नाही. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग केले जातेय. त्यात मुंबईला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानविरोधातील सामन्यानंतर बोलताना मनोज तिवारीने मुंबईच्या कर्णधारपदावर मोठा दावा केला.  मनोज तिवारीच्या मते रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईच्या संघाची धुरा जाऊ शकते. हार्दिक पांड्या आयपीएलच्या मध्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवेल. 


रोहित शर्मावर मनोज तिवारी काय म्हणाला ?


मनोज तिवारी म्हणाला की, 'मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पुन्हा एकदा रोहित शर्माकडे दिलं जाऊ शकतं. मुंबई इंडियन्सचे मालक असा निर्णय घेताना अजिबात संकोच करत नाहीत. रोहित शर्माने पाच वेळा चषक जिंकून दिला, तरीही मुंबईने यंदाच्या हंगामाआधी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील कामगिरी पाहता पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपद देताना मुंबईचा संघ संकोच करणार नाही. '






कर्णधार बदलणं खूप मोठा निर्णय आहे. पण यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाला आहे. पण हार्दिक पांड्याचं नेतृत्वही तितकं खास दिसत नाही. हार्दिकच्या नेतृत्वातच गडबड दिसत आहे, असे माजी क्रिकेटर मनोज तिवारी म्हणाला.  


हार्दिक पांड्याला जोरदार हूटिंग - 


हार्दिक पांड्याकडे मुंबईची धुरा सोपवल्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. त्यांच्या रोषाचा सामना हार्दिक पांड्याला करावा लागतोय. प्रत्येक सामन्यावेळी हार्दिक पांड्याला हूटिंग केले जाते. वानखेडे मैदानावरही हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यासमोर रोहित रोहित, मुंबईचा राजा रोहित शर्मा... अशी घोषणाबाजी केली जाते.