Mumbai Indians Vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सने सलग तिसरा सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध यंदाच्या आयपीएलमधील पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सामना खेळला. मुंबईचा पहिला सामना गुजरात आणि दुसरा सामना हैदराबादच्या मैदानावर खेळला होता. या दोन सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील वानखेडे मैदानावर देखील चाहते हार्दिकला लक्ष्य करतील, हे स्पष्ट होते आणि काल असेच घडले. हार्दिक पांड्या वानखेडेनवर नाणेफेकीसाठी आला होता. नाणेफेकीवेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला हूटिंग करण्यात आले.
सामनादरम्यान देखील वानखेडेवर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी रोहित शर्माच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडलं. मुंबईच्या सामन्यात रोहित शर्माच्या चाहत्यांनी वानखेडेबाहेर वातावरण निर्मिती केली होती. चाहत्यांनी मैदानात 'मुंबई का राजा रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या. मैदानात सामना सुरु झाल्यापासून तो संपेपर्यंत रोहित शर्मा नावाच्या घोषणा चाहत्यांकडून दिल्या जात होत्या. यावेळी रोहित शर्माने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ समोर येत असतानाच वानखेडे मैदानाबाहेरील एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रोहित शर्माचे पोस्टर आणण्यास बंदी घालण्यात आली होती, असा दावा करण्यात येत आहे. एका चाहत्याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये रोहितचे अनेक पोस्टर्स जे मैदानाबाहेरच फेकल्याचे दिसून येत आहे. या सर्व पोस्टर्सवर रोहित शर्माच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. रोहितच्या चाहत्यांचा हे पोस्टर्स मैदानात घेऊन जायचे होते. मात्र वानखेडे मैदानाबाहेरील सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना हे पोस्टर्स घेऊन जाण्यास मज्जाव केल्याचा दावा करण्यात येत आहे. सदर व्हिडिओबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र या व्हिडिओवरुन रोहित शर्माचे चाहत्यांना प्रचंड राग आल्याचे सोशल मीडियावरुन दिसून येत आहे.
मुंबईची खराब फलंदाजी-
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकांत 9 बाद 125 धावाच करता आल्या. संघाचे पहिले तीन फलंदाज गोल्डन डकला बळी पडले, ज्यात रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेस्विस यांचा समावेश होता. संघात फक्त कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला होता. हार्दिकने 34 आणि टिळकने 32 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.