IPL 2025 Retention: आयपीएलमधील (IPL 2025) सर्व फँचायझींना आज म्हणजेच 31 ऑक्टोबर पर्यंत संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करायची आहे. त्यामुळे अनेक संघानी आपली यादी बीसीसीआयला दिली आहे. याजरम्यान सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादने पाच खेळाडूंवर 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद उर्वरित 45 कोटी रुपयांसह लिलावात उतरेल.
सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला सर्वाधिक रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. 23 कोटी रुपये देऊन सनरायझर्स हैदराबाद क्लासेनलासोबत ठेवणार आहे. कर्णधार पॅट कमिन्सला 18 कोटी रुपये देऊन कायम ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना 14 कोटी रुपये देऊन कायम ठेवण्यात आले आहे. पाचवा खेळाडू म्हणून नितीश रेड्डी याच्याशी करार झाला आहे. नितीश रेड्डीला 6 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवणार आहे. हैदराबाद संघ गेल्या वर्षी उपविजेता ठरला होता, त्यामुळे संघाने प्रमुख खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबादने संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची यादी-
हेनरिक क्लासेन- 23 कोटी रुपये
पॅट कमिन्स- 18 कोटी रुपये
अभिषेक शर्मा- 14 कोटी रुपये
ट्रॅव्हिस हेड- 14 कोटी रुपये
नितीशकुमार रेड्डी- 6 कोटी रुपये
अभिषेक शर्माला लॉटरी-
अभिषेक शर्मासाठी सनरायझर्स हैदराबादने 14 कोटी रुपये खर्च केले आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात अभिषेक शर्माने 16 सामन्यात 484 धावा केल्या होत्या. गेल्या हंगामात अभिषेक शर्मा सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही होता. त्याने आयपीएल 2024 मध्ये एकूण 36 षटकार मारले होते. IPL 2024 मध्ये खेळण्यासाठी अभिषेकला 6.5 कोटी रुपये मानधन मिळाले होते. आता त्याला 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवल्याने अभिषेकच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे.
मेगा लिलावाआधी नवीन नियम जाहीर-
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मेगा लिलावाआधी नवीन नियम जाहीर केले आहेत. यामध्ये आयपीएलमधील (IPL) एक संघ जास्तीत जास्त 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतील. तर राईट टू मॅचचा (RTM) वापर करुन आणखी एक खेळाडू संघात ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आयपीएल 2025 मधील एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.