IPL 2025: आयपीएल स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंटसने बलाढ्य मानल्या जाणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाला घरच्या मैदानावर लोळवले. लखनऊने हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या संघात ट्रॅव्हिस हेड, क्लासेन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (Ishan Kishan) यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांचा समावेश आहे. गेल्या सामन्यात हैदराबादच्या(SRH) फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची कत्तल केली होती. यानंतर सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) प्रचंड आनंदी झाली होती. तिचा ड्रेसिंग रुममधील टीमशी संवाद साधनाचा व्हिडीओ आणि मैदानात सेलिब्रेशन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे कालच्या सामन्यातही काव्या मारन मैदानात त्याच अंदाजात दिसेल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात कालच्या सामन्यात लखनौ सुपर जायंटसने काव्या मारन हिला सेलिब्रेशन करायची एकही संधी मिळून दिली नाही

लखनौ सुपर जायंटसने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. केशरी रंगाचे कपडे घालून आलेली काव्या मारन हा सामना पाहण्यासाठी मैदानात आली होती. ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, अभिषेक शर्मा हे फलंदाज लखनौ सुपर जायंटसच्या गोलंदाजांची धुलाई करतील, असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, लखनौ सुपर जायंटसच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूर याने तिसऱ्याच षटकात लागोपाठच्या चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि इशान किशनला बाद केले. त्यानंतर प्रिन्स यादवने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केले. त्यामुळे सेलिब्रेशनच्या तयारीने मैदानात आलेल्या काव्या मारनचा चेहरा पडला होता. लखनऊच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना हैदराबादला डोके वर काढण्याची फारशी संधी दिली नाही. गोलंदाजांचा कर्दनकाळ मानले जाणारे हैदराबादचे फलंदाज एक-एक करुन माघारी परत असताना काव्या मारनच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. 

लखनऊच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे 200 ते 250 धावा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या हैदराबादला 190 धावाच करता आल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊच्या संघाकडून निकोलस पूरन याने वादळी खेळी केली. निकोलस पूरन याने 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवले. त्याने 26 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने 31 चेंडूत 52 धावा केल्या. त्यामुळे लखनऊने पाच गडी राखून हा सामना जिंकला.

आणखी वाचा

नवख्या गोलंदाजाची कमाल, ट्रेविस हेडच्या दांड्या उडवल्या, कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात मोठी शिकार

अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला