हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 190 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंटसच्या निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी वादळी फलंदाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. निकोलस पूरन यानं 70 धावा केल्या तर मिशेल मार्शनं 52 धावा केल्या. रिषभ पंत 15  धावांवर बाद झाल्यानंतर अब्दुल समद यानं 22  धावा करत संघाला विजय मिळवून दिला.  रिषभ पंतच्या नेतृत्त्वात लखनौला हा पहिला विजय मिळाला आहे.


हैदराबादची रणनीती त्यांच्याविरुद्ध चालवली


सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. आज लखनौच्या निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी वादळी फलंदाजी केली. निकोलस पूरन यानं 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. त्यानं 26 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली.  तर दुसरीकडे मिशेल मार्शनं 31 बॉलमध्ये 52  धावा केल्या. 


सनरायजर्स हैदराबादचा प्रतिकार


सनरायजर्स हैदराबादनं निकोलस पूरन आणि मिशेल मार्शच्या वादळी खेळीनंतर जोरदार प्रतिकार केला. निकोलस पूरन आणि मिशेल मार्श वगळता इतर फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत. वादळी फलंदाजी करणाऱ्या  निकोलस पूरन आणि मिशेल मार्शलाला कॅप्टन पॅट कमिन्स यानं बाद केलं. एडन मार्क्रम हा 1 रन करुन बाद झाला. तर, कॅप्टन रिषभ पंत 15 बॉलमध्ये 15  धावा करुन बाद झाला. आयुष बदोनीनं 6 धावा केल्या.


हैदराबादला शार्दूल ठाकूरनं रोखलं


सनरायजर्स हैदराबादला शार्दूल ठाकूरनं जोरदार धक्के दिले. शार्दूल ठाकूरनं चार विकेट घेत पर्पल कॅपचा मान पटकावला. डावाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये शार्दूलनं अभिषेक शर्मा, इशान किशनला बाद केलं. हैदराबादकडून सर्वाधिक 47 धावा ट्रेविस हेडनं केल्या. तर, अनिकेत वर्मानं 5 षटकारांच्या मदतीनं 36  धावा केल्या. पॅट कमिन्सनं तीन षटकार मारत 18 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबाद या जोरावर 9  बाद 190  धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीनं 32  तर हेनरिक क्लासेन यानं 26 धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं  4  ओव्हरमध्ये 34  धावा देत 4 विकेट घेतल्या. तर, आवेश खान दिग्वेश सिंह, रवि बिश्नोई आणि प्रिन्स यादवनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. 


पर्पल कॅप अन् ऑरेंज कॅप  लखनौकडे 


पर्पल कॅपचा मान शार्दूल ठाकूरनं मिळवला आहे. शार्दूल ठाकरच्या नावावर दोन मॅचमध्ये 6 विकेट झाल्या आहेत. त्यानं नवी दिल्लीविरुद्ध 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानं त्या मॅचमध्ये केवळ 2 ओव्हर टाकल्या होत्या. आजच्या मॅचमध्ये चार विकेट घेत त्यानं पर्पल कॅप मिळवली. दुसरीकडे लखनौचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन यानं दिल्ली आणि हैदराबाद विरुद्ध दमदार फलंदाजी करत ऑरेंज कॅप मिळवली आहे.