IPL 2024: Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2024: राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात झालेल्या सामन्यान राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. संदीप शर्माचे 5 बळी आणि यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक राजस्थानच्या विजयात महत्वाचे ठरले. राजस्थानने या विजयासह आयपीएली प्ले ऑफच्या फेरीचं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) वैयक्तिक पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूत विकेट घेत एक विक्रम आपल्या नावावर केला. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला बाद करत चहलने आयपीएलमधील 200 वी विकेट घेतली. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे चहलने मुंबई इंडियन्सच्या संघातूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन
आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. चहल 2022 रोजी राजस्थानच्या संघात दाखल झाला होता. चहलने 153 सामन्यात 200 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने सहावेळा चार विकेट्स, तर एकवेळा 5 विकेट्स पटकावण्याची कामगिरी केली.
मुंबईची खराब गोलंदाजी-
मुंबईला राजस्थानने संदीप शर्माच्या भेदकतेच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 179 धावांवर रोखले. हे लक्ष्य राजस्थानने 18.4 षटकांत 1 बाद 183 धावा करून पार केले. यशस्वी-जॉस बटलर यांनी 48 चेंडूंत 74 धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी करत संघाचा विजय स्पष्ट केला. सुमार गोलंदाजीसह गचाळ क्षेत्ररक्षणाचा मुंबईला फटका बसला. निर्णायक क्षणी मुंबईकरांनी दोन सोपे झेल सोडले.
गुणतालिकेची काय स्थिती-
सध्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 8 सामने खेळले असून 7 सामने जिंकले, तर एक सामन्यात पराभव झाला. राजस्थानचे सध्या 14 गुण आहेत. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद देखील 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा संघाने 7 सामन्यात 4 विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर, मुंबई इंडियन्स 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा 8 सामन्यात 3 विजय आणि 6 पराभव झाला आहे. दिल्लीचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानावर असून पंजाब 4 गुणांसह नवव्या, तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?